वंदना मगदूम यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:54 AM2018-07-17T00:54:46+5:302018-07-17T00:54:50+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतिपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी विकास आघाडीच्या वंदना चंद्रकांत मगदूम (माणगाव) यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शुभांगी शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडीसाठी सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ते दुपारी १ या अर्ज दाखल करण्याच्या वेळेत वंदना मगदूम यांचा एकमेव अर्ज आल्याचे सांगून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे इथापे यांनी जाहीर केले. यावेळी मगदूम यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून, फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
सव्वावर्षांनंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलण्याचे ठरल्याचे सांगत मगदूम यांच्याकडून याबाबत नेतेमंडळींच्या दोन महिन्यांपासून भेटीगाठी सुरू होत्या. ‘स्वाभिमानी’च्या शुभांगी शिंदे सहजासहजी राजीनाम्यासाठी तयार नव्हत्या; मात्र एकीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना प्र्रकाश आवाडे गटाला नाराज करणे शक्य नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी सूचना केली आणि त्यानंतर शिंदे यांनी राजीनामा दिला.
आवाडे गटाचा उमेदवार असल्याने आमदार सतेज पाटील यांनीही यामध्ये फार लक्ष घातले नाही. त्यामुळे मगदूम यांची निवड ही एक औपचारिकताच राहिली होती. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तारूढ सदस्यांची बैठक घेऊन त्यामध्ये मगदूम यांचे नाव जाहीर केले होते. त्यानुसार बिनविरोध ही निवड पार पडली. अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या हस्ते यावेळी मगदूम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, विशांत महापुरे, अंबरीश घाटगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, संजय अवघडे उपस्थित होते.
अभिनंदनाच्या निमित्ताने सत्तारुढ, विरोधकांची टोलेबाजी
मगदूम यांचे अभिनंदन करताना सत्तारूढ- विरोधकांनी एकमेकांना टोले लगावण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील म्हणाले, आम्ही तुम्हाला सहकार्य केले आहे तसे आता निधीच्याबाबतीतही आम्हाला सामावून घ्या. भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे म्हणाले, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळीच बिनविरोध करूया असे आवाहन केले होते; मात्र आता ते अमलात आणले गेले. प्रवीण यादव म्हणाले, ज्या पद्धतीने शुभांगी शिंदे यांनी राजीनामा दिला त्यांचे अनुकरण अन्य पदाधिकाऱ्यांनी करावे. शिक्षण सभापती अंबरीश घाटगे म्हणाले, माणगावचे उपसरपंच राजू मगदूम यांनी निवड होईपर्यंत आम्हाला झोपू दिले नाही. यावेळी राहुल आवाडे, बंडा माने, विजया पाटील, शिवाजी मोरे, मनीषा माने यांची भाषणे झाली.
आमचा नंबर
लवकर येणार नाही
निवडीनंतर शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ सदस्य, गटनेता अरुण इंगवले उभे राहिले. ते उभे राहिल्यानंतर अन्य सदस्यांनी आण्णा तुमचं काय असे विचारायला सुरुवात केली. तेव्हा ‘आमचा नंबर लगेच येणार नाही’ असे सांगत इंगवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
पुढच्या निवडणुकांनाही पाठिंबा राहू दे
अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी ज्या पद्धतीने शुभांगी शिंदे यांनी कारभार केला त्याच पद्धतीने नूतन सभापतींनी काम करावे. हे पद जिल्ह्याचे आहे त्यामुळे आपल्याला जिल्हाभर काम करावे लागणार आहे, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. तर याही पुढच्या निवडणुकांना विरोधकांचा पाठिंबा राहू दे, अशी अपेक्षा व्यक्त केली.