वारनूळच्या माठाला मुलखावेगळा ‘थंडावा’
By Admin | Published: April 3, 2017 12:21 AM2017-04-03T00:21:52+5:302017-04-03T00:21:52+5:30
महाराष्ट्रातून मोठी मागणी : चाळीसहून अधिक कुटुंबे व्यवसायात; फ्रीज, प्युरिफायरच्या जमान्यातदेखील मोठी मागणी -- लोकमत संगे जाणून घेऊ वेगळ््या वाटेवर गाव
विक्रम पाटील--- करंजफेण--कोल्हापूरच्या पश्चिमेला ३५ कि. मी. अंतरावर असणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील कळे गावापासून अवघ्या सहा कि. मी. अंतरावर वारनूळ हे गाव आहे. या गावची वेगळी ओळख मातीचे माठ व चुली बनविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे.गावच्या सुरुवातीलाच जुन्या व साध्या पद्धतीची ग्रामपंचायत इमारत गावातील लोकांची साधेपणाची ओळख करून देते. गावाला कासारी नदीच्या रूपाने नैसर्गिक देणगी लाभल्यामुळे गावाचा शिवार हिरव्यागार पिकांनी बहरला आहे. प्रामुख्याने गावातील लोक शेती व्यवसाय करतात; परंतु २२२ कुटुंबांपैकी ५० कुटुंबे ही कुंभारकाम करण्यात मग्न असल्याचे दिसून येते. त्यांनी बनविलेले माठ व चुली वारनूळ गावची महाराष्ट्राला खरीखुरी ओळखकरून देतात. त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या व सुबकतेच्या जोरावर संत गोरा कुंभार वसाहतीची एक नवी ओळख सर्वांना करून दिली आहे.
कुंभार समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक समाज. यामध्येसुद्धा आणखीन पोटजाती मानल्या जातात. या समाजाला वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे प्रमुख पारंपरिक व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे हा समाज पाहतो. उन्हाळ्याच्या सिझनमध्ये माठ व चुली बनविण्याचा व्यवसाय येथे जोमात केला जातो. त्यानंतर सणासुदीला लागणारे चिखलाचे साहित्य व गौरी-गपणपतीचे मुखवटे बनविण्यात हा समाज मग्न असतो; परंतु माठ व चुली बनविण्यात वारनूळच्या कारागिरांचा हातखंडा असल्यामुळे हे लोक मोठ्या उत्साहाने सर्व कुटुंबासह सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरोघरी हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात करताना दिसतात.
१ वारनूळचे माठ व चुली बनविण्यासाठी नदीकाठी असणारी चिकट व तेलकट माती एक हजार रु. ट्रॉली या दराने विकत घ्यावी लागते. त्यामध्ये घोड्याची लीद (शेण) घालून चिखल एकजीव करावा लागतो. त्यानंतर चिखलाचा गोळा इलेक्ट्रिक फिरत्या मशीनवर धरून माठाला आकर्षक आकार दिला जातो. व वेगवेगळ्या मापाचे तीन प्रकारचे माठ बनविले जातात. घोड्याची लीद (शेण) कऱ्हाड, उंब्रज, सातारा, कोल्हापूर येथून २०० रु. पोते या दराने विकत आणावे लागते. घोड्याच्या लीदमुळे माठ पाझरत नसून, टणक व गारवा टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळेच तर आमच्या माठांना मोठी मागणी असल्याचे कारागिरांचे म्हणणे आहे.
२ चक्रावर माठ तयार झाल्यानंतर त्याला विशिष्ट आकार देण्यासाठी ठराविक अंतराने लाकडी पट्टीद्वारे तीन वेळा बडविला जातो. महिला व मुली त्यावर आकर्षक नक्षीकाम करून गवत असलेल्या टोपलीमध्ये सुकण्यासाठी ठेवतात. पूर्णत: सुकलेला माठ भट्टीवर भाजण्यासाठी पाठविला जातो. पूर्णपणे तयार झालेल्या मोठ्या आकाराचा माठ ६० ते ७० रुपयाला बाजारात विकला जातो. तर लहान आकाराचा माठ ४० ते ५० रुपयाला विकला जातो. एक माठ तयार होण्यापर्यंत जवळपास २१ वेळा कारागीराला हाताळावा लागतो. त्यामुळे या कलेमागे मोठे कष्ट असल्याचे दिसून येते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळत नसल्यामुळे तरुण पिढी या व्यवसायाकडे पाठ फिरवित असल्याचे दिसत आहे.
३ कुटुंबातील सर्वांनी योगदान दिल्यास एक कुटुंब जवळपास दिवसा १०० ते १२५ नग तयार करतात. त्यातून जवळपास एक हजार ते १५०० रुपयांपर्यंतचा माल दिवसा तयार होतो. त्यामुळे कुंभार समाजातील लोक दुसऱ्याकडे रोजंदारीवर काम करण्यापेक्षा आपला पारंपरिक व्यवसाय करणेच पसंद करतात.
वारनूळचा माठ कसा ओळखायचा ?
हा माठ वजनाला हलका व टणक असा असतो. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या माठातून पाणी पाझरत नसून, पाणी नैसर्गिकरीत्या एकदम थंड राहते. प्रामुख्याने यावरील सुबक नक्षीकाम महिलांना ताबडतोब खरेदी करण्यासाठी मोहात पाडते.
गॅस, ओव्हनच्या जमान्यात चुली टिकून
कुटुंबातील वृद्ध महिला उरलेल्या चिखलातून मातीच्या चुली बनवितात. त्यावर आकर्षक नक्षीकाम करून शहरात व खेडोपाडी विक्रीस पाठवितात. येथील चुलींना सुद्धा नावलौकिक आहे. सरासरी या चुली पाच ते सहा वर्षे टिकण्याची हमी ग्राहकांना येथील महिला कारागीर देतात. त्यामुळे या माध्यमातून वृद्ध महिलांनासुद्धा चांगल्या प्रकारचा रोजगार मिळाला आहे.
दृष्टिक्षेपात वारनूळ (ता. पन्हाळा)
कुटुंबे - २२२
लोकसंख्या - १०५५
महिलांची संख्या - ५०४
ग्रामदैवत - मीनाईदेवी
एकूण क्षेत्रफळ - २७८ हेक्टर / ७८ आर
व्यवसाय - शेती, कुंभारकाम, दूध व गुऱ्हाळघर
दूधसंस्था - ५
सेवा सोसायटी - १
दूध उत्पादन - १००० लीटर दररोज
प्राथमिक शिक्षण - गावात
माध्यमिक व उच्च माध्यमिक - कळे किंवा बाजारभोगाव
शासकीय नोकरदार संख्या - शिक्षक दोन