कोल्हापूर-मुंबईसाठीही हवी 'वंदे भारत'; तीन खासदार असूनही अपेक्षाभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 05:56 PM2023-02-13T17:56:34+5:302023-02-13T17:57:11+5:30
एकाही खासदारांकडून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी का होत नाही
कोल्हापूर : मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत रेल्वे गाड्या सुरु झाल्या. दुसरीकडे कोल्हापूरहून मुंबईकडे सुटणाऱ्या केवळ दोनच रेल्वे उरल्या आहेत. मागणी असतानाही अन्य गाड्या रद्द झालेल्या आहेत किंवा कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. संसदेत कोल्हापूरचे तीन खासदार आहेत; पण एकाही खासदारांकडून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी का होत नाही. असा सवाल प्रवाशांकडून होत आहे.
कोराेनापूर्वी कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी, सह्याद्री आणि कोयना अशा तीन रेल्वे सुरळीत सुरु होत्या; मात्र प्रवाशांचा प्रतिसाद कमी म्हणून यातील सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने कायमची रद्द केली. कोरोनानंतर ही रेल्वे पूर्ववत सुरु होणे गरजेचे होते; मात्र अद्यापही ही रेल्वे सुरु झालेली नाही. कोल्हापूरहून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या उद्योजक, नोकरदार, व्यापारी, वकील, प्रशासनातील अधिकारी व सामान्य नागरिक अशा पाच ते सात हजार प्रवाशांना अन्य प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात याही रेल्वे गाड्या सुरु राहतात की नाही याची खात्री प्रवाशांना नाही.
ज्या भागातील राज्यकर्ते आणि खासदार स्ट्राँग त्या भागात नियमित काय वंदे भारत सारखी विशेष रेल्वेही सुरु होते; पण कोल्हापूरला तीन तीन खासदार असूनही मुंबईला जाण्यासाठी जादा रेल्वे सुरु कराव्यात. अशी जोरदार मागणी रेल्वे मंत्रालयाकडे होत नाही हे विशेषच म्हणावे लागेल. कोल्हापूर ते पुणे मार्गावर दुहेरीकरण सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर, सातारा- कोल्हापूर, कोल्हापूर-सातारा ही पॅसेंजर सेवाही २ मार्च २०२३ पर्यंत बंद करण्यात आली आहे. अन्य वाहनांचा आधार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही; पण विचार कोण करणार असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
वंदे भारत रेल्वे आवश्यक
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात मुंबईकरांचा अग्रक्रम लागतो. तर कोल्हापूरहून २००० प्रवाशांचे आरक्षण महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेससाठी रोज आहे. वंदे भारत सारखी रेल्वे सुरु झाली तर अन्य प्रवाशांचा प्रवासही सुलभ होईल आणि पर्यटन वाढीसाठी उपयोगही होईल.
दुहेरीकरण ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांपूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतर वंदे भारत सारख्या रेल्वे कोल्हापूरला सुरु होतील. खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनीही हा प्रश्न संसदेत लावून धरावा. - मोहन शेटे, रेल्वे अभ्यासक, कोल्हापूर