मार्चनंतर वंदेभारत, सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार; मध्य रेल्वेचे मुंबईच्या महाव्यवस्थापकानी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:30 IST2025-03-12T15:29:57+5:302025-03-12T15:30:44+5:30
कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, ...

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, त्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक मार्गी लागेल असे आश्वासन मध्य रेल्वेचे मुंबईचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी मंगळवारी कोल्हापुरात दिली. या भेटीनंतर त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन करवीर निवासिनीचे दर्शन घेतले.
रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक पदभार स्वीकारल्यानंतर मीना यांनी प्रथमच कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सला भेट दिली. त्यांच्यासोबत सुरक्षा यंत्रणाही होती. अमृत भारत योजनेंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष तासभर पाहणी करत अनेक सूचना दिल्या. कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाची हेरिटेज वास्तूला धक्का लागणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मार्चअखेर पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल, तसेच मुंबईतील चारही फ्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होईल, त्यानंतर स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस आणि पुण्यापर्यंत धावणारी विशेष रेल्वे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावेल, अशी माहिती मीना यांनी दिली.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत पीसीओ शामसुंदर गुप्ता, पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे एसडीओएम डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, मुख्य बांधकाम व्यवस्थापक, विद्युत अभियंता, विभागीय अभियंता, स्टेशन व्यवस्थापक विजय कुमार उपस्थित होते. यावेळी सांगली, कोल्हापूर रेल्वे प्रवासी संस्थेतर्फे रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, जयंत ओसवाल यांनी मीना यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईची प्रतिमा मीना यांना भेट दिली.
रेल्वे अधिकाऱ्यांची झाडाझडती
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना टर्मिनसच्या पाहणीसाठी सकाळी सहा वाजता आले. त्यांनी रनिंग रूम, लिनन कक्ष, पार्सल कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, मुख्य तिकीट आरक्षण, स्थानक इमारत व तिकीट विक्रीच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यांनी सुमारे एकवीस मिनिटे छत्रपती शाहू टर्मिनसची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रवाशांची गर्दी पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तिकीट मशीन जादा का लावलेली नाहीत, असा प्रश्न केला. तेथे सीसीटीव्ही नसल्याचेही त्यांनी लक्षात घेऊन सीसीटीव्ही त्वरित बसविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
रुकडी, जयसिंगपुरात लूप लाईन
कोल्हापूर-मिरज दुहेरीकरण काम या वर्षअखेरीपर्यंत पूर्ण होईल. या मार्गाच्या फायनल लोकेशनचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव असल्याचेही मीना यांनी सांगितले. याच मार्गावर रुकडी आणि जयसिंगपूर स्थानक येथे लूप लाईनला मंजुरी मिळाली असून, त्याचे काम पूर्ण होताच क्रॉसिंगचा वेळ कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळातील बंद गाड्या पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. वळीवडे (गांधीनगर) स्थानकावर काही गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.