वनिताचा मृतदेह घराच्या अंगणातच!
By admin | Published: August 20, 2016 12:03 AM2016-08-20T00:03:50+5:302016-08-20T00:10:38+5:30
अंजिराचे झाड तोडून सांगाडा बाहेर : संतोषची ‘फिरवाफिरवी’ अखेर धोममध्येच समाप्त
सातारा : धोम धरणापासून ते मसूरच्या नदीकाठापर्यंत सातारा पोलिसांना फिरविणाऱ्या कोल्ड ब्लडेड सिरियल किलर संतोष पोळने शुक्रवारी मात्र आपला शब्द पाळला. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या धोम गावातील घरासमोरच पोलिसांनी तीन तास राबून पाच फूट मोठा खड्डा खणला. अखेर अंजिराच्या झाडाखाली वनिता गायकवाडच्या मृतदेहाचा सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला. यामुळे सहाही खून कबूल केलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचे सापळे पोलिसांच्या हाती लागले असले तरी आता त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहेत.
सुरुवातीला २००६ मध्ये वनिता गायकवाडचा खून करून कृष्णा नदीपात्रात तिचा मृतदेह टाकल्याचे संतोषने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे त्याला उंब्रज आणि मसूर येथे नेण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री साताऱ्यात परत आल्यानंतर त्याने वनिताचा मृतदेह कुठे गाडून ठेवला, याबाबत अखेर तोंड उघडले. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास संतोष पोळसह पोलिसांचा फौजफाटा धोम येथील घराजवळ पोहोचला. घरासमोरच्या अंगणातील अंजिराच्या झाडाखाली खोदकाम करून सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हाडांचा सापळा काढण्यात पोलिसांना यश आले. संतोषच्या म्हणण्याप्रमाणे हा सांगाडा वनिता गायकवाड यांचा असून, दि. १२ आॅगस्ट २००६ रोजी संतोषच्या घरातच डोक्यात गज मारून या ठिकाणी तिला गाडले होते. त्यानंतर माती लोटून त्यावरच अंजिराचे झाड लावले होते. गेल्या दहा वर्षांत हे झाड तब्बल वीस फूट उंच झाले होते.
धोम येथे राहणाऱ्या वनिता गायकवाड उपचारासाठी संतोष पोळकडे सातत्याने जात होत्या. २००६ मध्ये त्याही अचानक गायब झाल्या होत्या. हा मृतदेह वनिता गायकवाड यांच्याच आहे का? हे डीएनए चाचणीनंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)