उचगावमध्ये पिलाला दगड मारल्याने वानरसेनेचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:30 AM2018-06-25T00:30:05+5:302018-06-25T00:30:09+5:30
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील सरस्वती कॉलनी परिसरात रविवार दुपारी खेळत असणाऱ्या मुलांनी वानराच्या पिल्लास दगड मारल्याने संतप्त वानरांनी रुद्रअवतार धारण करीत अनेक घरांची काचेची तावदाने फोडली. यावेळी त्यांनी दारात लावलेल्या कारचीही काच फोडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. रविवारी दुपारी ही घटना घडली.
सरस्वती कॉलनीत एका झाडावर वानरी व तिची पिल्ले गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास आहेत. येथील खेळणाºया मुलांनी गंमत म्हणून दगड फेकून मारले. वानरी दगड चुकवित असताना एक दगड एका पिलाला लागला. त्यात हे पिल्लू जखमी झाल्याचे पाहून वानरी व तिची अन्य पिल्ली तसेच या परिसरातील इतर वानरेही सैरभैर झाली. त्यांच्या हाताला जे जे लागेल ते ते ती भिरकावत सुटली. परिसरातील नागरिकांवरही धावून जाऊ लागली. खेळणारी मुले तेथून पळून गेली. दोन तास हा थरार या परिसरात सुरू होता. ग्रामस्थांनी आपल्या घरांची दारे-खिडक्या बंद केल्याचे पाहून वानरांनी त्यांच्या दारांवर, घरांवर, खिडक्यांवर हल्ला चढवला. त्यात अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. एका घराच्या दारात लावलेल्या कारलाही वानरांनी लक्ष्य केले. कारवर मोठी फांदी फेकल्याने कारची मागील काच फुटली आहे. वानरसेनेचा एवढा रुद्रावतार पहिल्यांदाच ग्रामस्थांनी अनुभवला. हा थरार एखाद्या चित्रपटातील दृश्यात शोभेल असाच होता. काही ग्रामस्थांनी व मुलांनी वानरांचा रुद्रावतार बघून तेथून पळ काढला; पण केवळ दोन तासांत घडलेल्या या प्रकाराने वातावरण गंभीर झाले होते.
पिल्लू जखमी झाल्याने
पिल्लू जखमी झाल्याने वानरी संतप्त झाली होती. ती दोन तास इकडे तिकडे धुमाकूळ घालत फिरत होती. बाकीची वानरे तिला सोडून गेली तरी ती जागची हलली नव्हती. ग्रामस्थ किंवा खेळणारी मुले दिसली की ती जास्तच आकांडतांडव करीत होती.