आंबोलीतील गोगलगाईच्या नव्या पोटजातीला वरद गिरी यांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:39+5:302021-07-02T04:16:39+5:30
कोल्हापूर : पश्चिम घाटातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या आंबोली परिसरात आढळलेल्या गोगलगाईच्या नव्या पोटजातीला कोल्हापूरच्या डॉ. वरद गिरी यांच्या नाव ...
कोल्हापूर : पश्चिम घाटातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या आंबोली परिसरात आढळलेल्या गोगलगाईच्या नव्या पोटजातीला कोल्हापूरच्या डॉ. वरद गिरी यांच्या नाव देण्यात आले आहे. कऱ्हाडच्या प्राध्यापकांसह चौघांनी ही प्रजाती शोधली असून ‘वरदिया’ असे या पोटजातीचे नाव आहे. या नव्या प्रजातीचे ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असे नामकरण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात शोधलेली ही २१ वी नवीन प्रजाती आहे.
सिंधुदुर्गातील आंबोली गावातील ‘शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ’मधून ही पोटजात शोधली असून, कऱ्हाडमधील संत गाडगे महाराज महाविद्यालयातील प्रभारी सहाय्यक प्राध्यापक डाॅ. अमृत भोसले यांच्यासह ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’चे प्रमुख आणि संशोधक तेजस ठाकरे, दीपक मुळ्ये आणि ‘एनएचएम लंडन’चे डाॅ. दिनारझार्दे रहिम यांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. गेल्याच आठवड्यात ‘युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनाॅमी’ या संशोधन नियतकालिकामध्ये या शोधाची माहिती प्रकाशित झाली आहे.
कऱ्हाडमधील संत गाडगे महाराज महाविद्यालयात प्रभारी सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डाॅ. अमृत भोसले यांना २०१७मध्ये आंबोली येथे सर्वेक्षण करताना गोगलगाईची ही प्रजाती सर्वप्रथम आढळली. याठिकाणी त्यांना ही प्रजात २०१९ आणि २०२०च्या पावसाळ्यातही आढळली होती. या प्रजातीचे आंबोली परिसरात आढळणाऱ्या दुसऱ्या एका गोगलगायीच्या प्रजातीबरोबर साम्य हाेते. डॉ. भोसले यांनी या नव्या प्रजातीचे नमुने जमा करुन त्यांची डीएनए तपासणी, शंखाचा आकारशास्त्रीय अभ्यास आणि रिप्रॉडक्शन सिस्टीमचे निरीक्षण केल्यानंतर ही केवळ नवीन प्रजाती नाही, तर गोगलगायीची नवीन पोटजात असल्याचे समजले.
असे आहे या गोगलगाईचे वैशिष्ट्य
‘वरदिया आंबोलिएन्सिस’ ही गोगलगाय पश्चिम घाटात आढळणारी प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे. आंबोली धबधबा, शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसास्थळ, आंबोली वन उद्यान, तिलारीतील कोडीळी आणि कर्नाटकातील याना वनक्षेत्रामध्ये ही प्रजाती आढळली आहे. सर्वसाधारणपणे आर्द्रता असलेल्या ठिकाणी ही प्रजाती आढळते. आंबोली धबधब्यानजीक झाडावर, पालापाचोळ्यामध्ये, दगडावर आणि हिरण्यकेशी मंदिराच्या भिंतींवर ही गोगलगाय आढळली. तिचा रंग करडा काळसर असून, ती ७ सेंटीमीटरपर्यंत वाढते.
कोट
डाॅ. वरद गिरी हे देशातील सरीसृप आणि उभयचर शास्त्रज्ञ आहेत. तरूण संशोधकांना मदत करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. सध्या गिरी बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सरीसृप आणि उभयचर जीवांमधील तीन पोटजाती आणि ५७ प्रजाती शोधून काढल्या असून, ५ प्रजाती आणि एका पोटजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
- डाॅ. अमृत भोसले,
प्रभारी सहाय्यक प्राध्यापक,
संत गाडगे महाराज महाविद्यालय, कऱ्हाड.
कोट
पश्चिम घाटामध्ये असलेल्या अनेक प्रजातींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे या प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे. गोगलगायींसारख्या सूक्ष्म प्रजातींचा तर फारच कमी अभ्यास झाला आहे. डॉ. अमृत भोसले हे मागील काही वर्षांपासून नव्याने शोधलेल्या गोगलगायीच्या प्रजातीवर काम करत असून, या शोधाला हातभार लावल्याचा मला आनंद आहे.
- तेजस ठाकरे, संशोधक,
प्रमुख, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’
कोट
गोगलगायीसारख्या छोट्या प्रजातींवर काम करणारे फार कमी संशोधक असून, त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. माझे नाव या प्रजातीला दिल्याचा मला आनंदच आहे. यामुळे माझ्या कामाचा बहुमान झाला आहे, असे मी समजतो.
- डाॅ. वरद गिरी,
सरीसृप आणि उभयचर शास्त्रज्ञ,
बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी.
--------------------------------------------------------
फोटो : 01072021-kol-amboli gogalgai01-by omkar yadav
फोटो : 01072021-kol-amboli gogalgai
फोटो ओळी : आंबोलीत आढळलेली ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ प्रजातीतील गोगलगाईची नवी पोटजात. (छाया सौजन्य : ओंकार यादव)
010721\01kol_1_01072021_5.jpg~010721\01kol_2_01072021_5.jpg
फोटो : 01072021-kol-amboli gogalgaiफोटो ओळी : आंबोली आढळलेले ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ प्रजातीतील गोगलगाईची नवी पोटजात.(छाया सौजन्य : ओंकार यादव)~फोटो : 01072021-kol-amboli gogalgai01-by omkar yadavफोटो ओळी : आंबोली आढळलेले ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ प्रजातीतील गोगलगाईची नवी पोटजात.(छाया सौजन्य : ओंकार यादव)