वारणानगर लुटीचा सीआयडी तपास सुरू

By Admin | Published: April 21, 2017 12:48 AM2017-04-21T00:48:45+5:302017-04-21T00:48:45+5:30

पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम कोल्हापुरात; हर्ष पोद्दार यांच्याकडून घेतली गुन्ह्याची माहिती

Varananagar looted CID investigation started | वारणानगर लुटीचा सीआयडी तपास सुरू

वारणानगर लुटीचा सीआयडी तपास सुरू

googlenewsNext

कोल्हापूर/सांगली : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाच्या तपासाचा आढावा गुरुवारी राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभागाने (सीआयडी)कोल्हापुरातील शनिवार पेठेतील कार्यालयात दिवसभर घेतला. यासाठी या विभागाचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम आले आहेत. तपास अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे देऊन या गुन्ह्याची संपूर्ण माहिती कदम यांना दिली.
वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संगनमत करून सुमारे नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविला. या प्रकरणी तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह सातजणांना निलंबित केले आहे. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभाग (सीआयडी) यांच्याकडे वर्ग केला. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रव्यवहार केला. त्यानुसार गुरुवारी सकाळी सीआयडी पुणे विभागाचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह कोल्हापूरचे सहायक पोलिस अधीक्षक तथा तपास अधिकारी हर्ष पोद्दार शनिवार पेठेतील ‘सीआयडी’च्या कार्यालयात आले. त्यांनी वारणानगर येथे सांगली पोलिसांनी मारलेल्या डल्ल्याच्या माहितीसह आजपर्यंतच्या एकूण तपासाची माहिती दिली. तसेच कदम यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी कोल्हापूर (सीआयडी)चे पोलिस अधीक्षक आर. आर. बनसोडे उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ‘सीआयडी’चे पथक वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत गेले असल्याचे समजते.

निलंबित पोलिसांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांची रोकड लंपास केल्याच्या आरोपातील संशयित स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह सात पोलिसांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त आहे. सीआयडी पथक त्यांचा शोध घेत असले तरी, पथकाला अजून कोणाचाही सुगावा लागलेला नाही.


‘त्या’ पोलिसांची लवकरच बडतर्फी
वारणानगरातील या लूट प्रकरणातील निलंबित पोलिसांवर लवकरच बडतर्फीची कारवाई होण्याचे संकेत आहेत.


‘त्या’ खोलीची आज पाहणी
पुढील दोन दिवस पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम कोल्हापुरातच मुक्काम ठोकणार असून, या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले. वारणानगर येथील ज्या खोलीतील पैशांवर सांगलीच्या पोलिसांनी गतवर्षी डल्ला मारला त्या खोलीची पाहणी कदम यांच्यासह सीआयडीचे अधिकारी आज, शुक्रवारी करणार असल्याचे कोडोली पोलिसांनी सांगितले.

Web Title: Varananagar looted CID investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.