कोल्हापूरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध २६ कामगार संघटनांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 03:22 PM2019-01-08T15:22:33+5:302019-01-08T15:23:12+5:30
गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख्या मोठी होती.
कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख्या मोठी होती.सत्ताधारी भांडवलदारांचे हित जोपासत आहे अशी टीका यावेळी करण्यात आली. याप्रश्नी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वा. होणाऱ्या निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
किमान वेतन १८ हजार रुपये अधिक महागाई भत्ता, कंत्राटीकरण रद्द करा, मानधनी सेवेची पद्धत रद्द करा, मानधन नको-वेतन द्या, रेल्वे विमा संरक्षण खात्यात परदेशी गुंतवणूक धोरण रद्द करा आदी मागण्यांबाबत दूपारी टाऊन हॉल येथून कामगार संघटना संयुक्त कृति समितीने मोर्चास सुरुवात केली. ‘कामगार विरोधी मोदी सरकार’, ‘गरीब विरोधी मोदी सरकार’, ‘बेकारी वाढवणारे मोदी सरकार’ , ‘महागाई वाढवणारे मोदी सरकार ’ अशा घोषणा देत मोर्चेकरी सीपीआर चौक, दसरा चौक, सुभाष रोड, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकिज, आझाद चौकमार्गे बिंदू चौकात मोर्चाची सांगता झाली.
यावेळी अतुल दिघे म्हणाले, काही मालकांनी हा संप कामगारांनी करु नये म्हणून अडवणूकीची भुमिका घेतली. पण ; या कामगारांनी त्यांची दादागिरी जुगारुन या मोर्चात ते सहभागी झाले. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. केंद्र सरकार भांडवलदारांचे हित जोपासत आहे. त्यामुळे यांनाच ‘अच्छे दिन’ आलेत.ते आम्हाला आलेले नाहीत. याचे कारण म्हणजे सरकारने राबविलेली कामगार विरोधी धोरणे होय. आपल्या कामगार संघटनांनी दिल्लीत निवेदन दिल्यामुळे येथे आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले नाही.
मोर्चात इंटक, आयटक, वर्कस फेडरेशन, महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना, आशा वर्कस, भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग- ३ या संघटनांच्या प्रतिनिधींसह एस.बी.पाटील, बाबुराव तारळी, बी.एल.बरगे, नामदेव गावडे, डॉ. सुभाष जाधव, शाहीर सदाशिव निकम, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, आनंदराव परुळेकर, भगवान पाटील, प्रभाकर आरडे आदींचा सहभाग होता. दिलीप पवार यांनी आभार मानले.
धडकी भरणारा मोर्चा...
मोर्चात शेतकऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत तसेच शालेय पोषण आहारमधील महिला, अंगणवाडी सेविका यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.त्यामुळे हा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा होता,अशा प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या.