जैन सेवा संघातर्फे काेरोनाबाधितांसाठी विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:25+5:302021-05-24T04:24:25+5:30
कोल्हापूर : जैन सेवा संघ यांच्या वतीने आणि संवेदना हेल्पिंग हँड सोशल फौंडेशन यांच्या सहकार्याने शहरातील काही कोविड केअर ...
कोल्हापूर : जैन सेवा संघ यांच्या वतीने आणि संवेदना हेल्पिंग हँड सोशल फौंडेशन यांच्या सहकार्याने शहरातील काही कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या नागरिकांसाठी समुपदेशन, योगा, आहार, विहार, आचार यासारख्या गोष्टींचे प्रात्यक्षिकांद्वारे प्रबोधन करण्यात आले.
भगवान महावीर यांच्या जगा व जगू द्या या शिकवणीप्रमाणे संघातर्फे सीपीआर याठिकाणी जलशुद्धिकरण यंत्र देण्यात आले. त्याचबरोबर आपल्या घरापासून लांब असलेल्या या सेंटरमधील लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी धार्मिक तसेच विविध गाण्यांचा कार्यक्रमाद्वारे त्या लोकांचे मनोरंजन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ येथील वसतिगृह क्रमांक २ व ३ तसेच डीओटी विभागात हे उपक्रम राबविण्यात आले. या ठिकाणी असलेल्या बालकल्याण संकुलमधील मुलांसाठी पारंपरिक व लोप पावत चाललेल्या लेझीम खेळाची देखील प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. तसेच मुलांसाठी आंबा, सफरचंद, डाळिंब यासारखी फळे वाटण्यात आली.
रविवारी दिगंबर जैन बोर्डिंग दसरा चौक येथील सेंटरच्या लोकांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांनी योगा आणि मेडिटेशनचे महत्त्व सांगितले. संघातर्फे एक ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे तसेच जैन बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.