शाहू छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:15+5:302021-01-08T05:24:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भूतपूर्व करवीर संस्थान वारसदार शाहू छत्रपती यांचा वाढदिवस गुरुवारी साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भूतपूर्व करवीर संस्थान वारसदार शाहू छत्रपती यांचा वाढदिवस गुरुवारी साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांसह समाजातील मान्यवरांनी त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयाच्या प्रांगणात शाहू छत्रपतींना शुभेच्छा देण्याकरिता गुरुवारी सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी उसळली होती. सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे आगमन होताच शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले, तर तारा कमांडोजच्या विद्यार्थिनींनी त्यांना मानवंदना दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार धैर्यशील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संजय डी. पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाहू छत्रपतींचा सत्कार केला. याप्रसंगी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, विश्वविजय खानविलकर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन, फुटबॉलपट्टू दिओगो मॅराडोना यांच्या प्रतिमेचे अनावरण, टेबलटेनिस असोसिएशनच्या वेबसाईटचे अनावरण, संभाजीराजे फौंडेशनने घेतलेल्या रुग्णवाहिकेचे अनावरण शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले.
फोटो क्रमांक -०७०१२०२१-कोल-शाहू छत्रपती०१
ओळ - कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांचा वाढदिवस गुरुवारी विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी संयोगिताराजे व मधुरिमाराजे यांनी वाढदिवसानिमित्त शाहू छत्रपतींना केक भरविला.