सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी जानेवारीपासून विविध अभ्यासक्रम -उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:51 PM2020-10-09T16:51:31+5:302020-10-09T16:53:44+5:30
Shivaji University, Education Sector, kolhapur, belgaon, udaysamant, minister सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ संचलित असणारे शैक्षणिक संकुल चंदगड तालुक्यातील शिनोळी-तुडये दरम्यान सुरू केले जाईल. या संकुलाच्या माध्यमातून जानेवारीपासून कौशल्य विकासाला बळ देणारे रोजगाराभिमुख विविध पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ संचलित असणारे शैक्षणिक संकुल चंदगड तालुक्यातील शिनोळी-तुडये दरम्यान सुरू केले जाईल. या संकुलाच्या माध्यमातून जानेवारीपासून कौशल्य विकासाला बळ देणारे रोजगाराभिमुख विविध पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
शिनोळी एमआयडीसीतील एका कंपनीची पाच एकर जागा आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली असून, ती पाच वर्षांच्या भाडेतत्त्वावर उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी लवकरच तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक संकुलाचा प्रारंभ करण्यात येईल. या संकुलाला कायमस्वरूपी तुड्ये येथील दहा एकर शासकीय जागा मिळवून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे.
अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक सामंजस्य करार करण्याची विद्यापीठाला सूचना केली आहे. सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीसह अन्य संघटनांसमवेतही चर्चा करून त्यांना अभिप्रेत असणारे अभ्यासक्रम सुरू केले जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, आढावा बैठकीत खासदार संजय मंडलिक यांनी अभ्यासक्रम सुरू करण्याबाब सीमाभागातील नागरिक, विविध संघटनांसमवेत चर्चा करावी असे सुचविले. आढावा बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आदी उपस्थित होते.
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दक्षता घेण्याची सूचना
सोलापूर, मुंबई, गोंडवाना विद्यापीठातील प्रकार लक्षात शिवाजी विद्यापीठाला अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत दक्षता घेण्याची सूचना केली आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या चर्चा केली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी बैठक घेतील. कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा होतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.