मराठी भाषा समृध्द करण्यासाठी विविध प्रयोग व्हावेत : वसंत भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 03:15 PM2021-02-27T15:15:59+5:302021-02-27T15:19:19+5:30
Marathi Bhasha Din Shivaji University Kolhapur- विविध क्षेत्रातील लोकांचे लेखन, इतर भाषा आणि त्यातील साहित्य स्वीकारून त्याचा अनुवाद करणे, असे विविध प्रयोग मराठी भाषा समृध्द करण्यासाठी व्हावेत. मराठीला ज्ञानभाषा बनविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी आदी सर्व विद्याशाखांचे ज्ञान, माहिती मराठी भाषेमध्ये यावी, असे प्रतिपादन ह्यलोकमतह्णचे संपादक वसंत भोसले यांनी केले.
कोल्हापूर : विविध क्षेत्रातील लोकांचे लेखन, इतर भाषा आणि त्यातील साहित्य स्वीकारून त्याचा अनुवाद करणे, असे विविध प्रयोग मराठी भाषा समृध्द करण्यासाठी व्हावेत. मराठीला ज्ञानभाषा बनविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी आदी सर्व विद्याशाखांचे ज्ञान, माहिती मराठी भाषेमध्ये यावी, असे प्रतिपादन ह्यलोकमतह्णचे संपादक वसंत भोसले यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार विजेत्या लेखकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
शासनाचा महात्मा फुले वाङ्मय पुरस्कार विजेते डॉ. व्ही. एन. शिंदे आणि विजय तेंडुलकर वाङ्मय पुरस्कार विजेते अनुप जत्राटकर यांचा सत्कार संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते शाल, पुस्तक, गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
युरोपियन देश, स्वीडनच्या लोकसंख्येपेक्षा आपल्या राज्यातील मराठी भाषिक अधिक आहेत. या देशांनी मातृभाषा समृध्द केली. मात्र, आपण त्यादृष्टीने मराठीबाबत फार काही केले नसल्याची खंत आहे.
मराठी भाषा समृध्द होण्यासाठी इतर भाषांमधील साहित्य मराठीत यावे. विविध क्षेत्रातील लोकांनी मराठीत लेखन करावे. त्यादृष्टीने डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी विज्ञान लेखनाचे टाकलेले पाऊल उल्लेखनीय असून त्यांनी यापुढेही लेखन सुरू ठेवावे. अनुप जत्राटकर यांनीही एकांकिका लेखनाच्या माध्यमातून मराठी भाषेला बळ देण्याचे काम केले असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.
मराठीत बोलणे, वाचणे, लिहिणे केले, तरच ही भाषा समृध्द होईल. त्यादृष्टीने मराठी विभागाचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. ह्यलोकमतह्णमधील लेखांमुळे पुस्तक लिहिले. त्यासाठी प्रेरणा देणाऱ्या संपादकांच्याहस्ते माझा सत्कार झाल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञानाचा हात धरून लेखन क्षेत्रात वाटचाल करणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
निष्पर्णमध्ये स्त्रियांची मानसिकता मांडली आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असल्याचे दिग्दर्शक जत्राटकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. केशव राजपुरे, के. डी. सोनवणे, आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राजेश पाटील यांनी आभार मानले.
मराठी चित्रपटांबाबत विचार गरजेचा
न्यूयॉर्क शहरात १९३ भाषा लिहिता-वाचता येणारे, तर ८०० बोलीभाषा बोलणारे लोक राहतात. जगभरातील सांस्कृतिक, साहित्यिक आदान-प्रदानाचे ते केंद्रच बनले आहे. दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांतील चित्रपट जगाची भाषा बोलत असून, त्यांची स्वीकारार्हता वृद्धिंगत करताना त्यांच्या तुलनेत मराठी चित्रपट कमी पडताहेत का? याचा विचार करण्याची गरज असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.
कुस्ती, चित्रपटांचा इतिहास विद्यापीठाने लिहावा
कोयना प्रकल्पाच्या निर्मितीवर पुस्तक लिहिण्याचे काम डॉ. शिंदे यांनी करावे. कोल्हापुरी कुस्ती आणि मराठी चित्रपटांच्या इतिहासाचे लेखन विद्यापीठाकडून व्हावे, असे संपादक भोसले यांनी यावेळी सुचविले. याबाबत विद्यापीठ निश्चितपणे विचार करेल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.