मंगळवार पेठेत घडणार वैविध्यपूर्ण मूर्तींचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:02 AM2017-08-27T01:02:48+5:302017-08-27T01:03:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : गणेशमूर्तींतील विविधता पाहायची असेल तर मंगळवार पेठेत फेरफटका मारणे उचित ठरेल. सजीव देखावे तसेच विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्तींचे वेगळेपण प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मंगळवार पेठेने जपले आहे. तर गणेश चतुर्थीच्या दुसºया दिवशीही अनेक लहान-मोठ्या मंडळांनी ‘श्री’च्या मूर्तीची वाजत-गाजत प्रतिष्ठापना केली.
गणेशोत्सवात गणेशमूर्तींची विविधता ही मंगळवार पेठेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पाहावयास मिळत आहे. अशा वैविध्यपूर्ण गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना शुक्रवारी झाली असली, तरीही त्या गणेशमूर्तींभोवती सजावट, विद्युत रोषणाई, देखावे करण्यात गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्ते झटत आहेत.
पुरातन काळातील गणेशमूर्ती निर्माण करण्याची आवड जय पद्मावती तरुण मंडळाने परिसरातील मंडळांच्यात निर्माण केली. या मंडळाने गेल्या २५ वर्षांत देश-विदेशांतील, पुरातन काळातील आकर्षक गणेशमूर्ती निर्माण करून वेगळेपण निर्माण केले आहे.
यंदाच्या वर्षी मंडळातर्फे थायलंड देशातील एका पार्कमधील आकर्षक त्रिभूज प्राचीन गणेशमूर्ती साकारली आहे. याशिवाय याच परिसरात राधाकृष्ण तरुण मंडळाने श्रीकृष्ण रूपातील गणेशमूर्ती, याशिवाय फिरत्या भोवºयावर नृत्य करणारा भव्य श्री गणेश, कोळेकर तिकटी चौकातील मॉडर्न स्पोर्टस क्लबने माकडखेळ करणारा श्री गणेश अशा अनेक आकर्षक गणेशमूर्ती हेच मंगळवार पेठेचे आकर्षण केंद्र ठरणार आहे. ‘प्रिन्स क्लब’चे उखाणे ऐकण्यास गर्दी
गणेशोत्सवात प्रतिवर्षी लक्ष वेधणाºया खासबाग येथील प्रिन्स क्लबने यंदा मंडळाच्या उत्सवाची धुरा सर्व महिला व युवतींकडे सोपवली आहे. मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकीत परिसरातील महिला व युवतींनी डोक्यावर भगवे फेटे परिधान करून हलगीच्या तालावर लेझीम खेळून साºयांचे लक्ष वेधले, तर शनिवारी या मंडळाच्यावतीने सायंकाळी महिलांसाठी उखाणा स्पर्धा घेतल्या. उखाणे ऐकण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे मिरजकर तिकटी ते शिवाजी स्टेडियमकडे जाणारा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला होता.
पाटाकडीलचा गणेशोत्सव शांततेत
प्रतिवर्षी गणेशोत्सवात मंगळवार पेठेत लक्ष वेधणाºया पाटाकडील तालीम मंडळाने यंदाचा गणेशोत्सव शांततेत करण्याचा निर्णय घेतला आहे. फुटबॉल संघाचे अध्यक्ष पांडबा जाधव यांचे निधन झाल्याने गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोळेकर तिकटी चौकातील ब्लड गु्रपचाही गणेशोत्सव शांततेत करण्यात येत आहे.