सिंधुदुर्ग : विभागीय युवक महोत्सवात विविध कला प्रकारांचे सादरिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:48 AM2018-10-22T11:48:28+5:302018-10-22T12:01:39+5:30
कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 16 व्या विभागीय युवक महोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी नृत्य, गायन, वादन अशा 32 विविध कला प्रकारांचे सादरिकरण स्पर्धकानी केले. कोल्हापृर, सांगली, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धक यावेळी उपस्थित होते.
कणकवली : देशातील सध्याची तरुणांची संख्या पहाता पारंपारिक शिक्षण पुरेसे नाही. त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासारख्या विद्यापिठांची गरज आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून राबविले जाणारे उपक्रम स्तुत्य असेच आहेत. आपला देश महासत्ता बनण्यासाठी तरुणांच्या मनावर शिक्षणाच्या माध्यमातूनच संस्कारांचे बीजारोपण करावे लागेल, असे मत कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई खोत यांनी येथे व्यक्त केले.
येथील कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 16 व्या विभागीय युवक महोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक दादासाहेब मोरे , शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू , प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे, केंद्र संयोजक प्रा. विजय सावंत, प्रा. प्रवीण सावंत, प्रा. कांबळे, राठोड, प्रा. हरिभाऊ भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाई खोत पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील तरूणपण हा एक अविभाज्य भाग आहे. या तरुणपणात नवीन काही तरी करावे असे तरुणांना वाटते. यावेळी योग्य शिक्षण मिळाल्यास तरुणांना त्यांच्या जीवनाचे ध्येय गवसते आणि त्यादृष्टीने ते वाटचाल करतात. आपला उत्कर्ष साधतात. त्यामुळे तरुणांना दिशा देण्याच्या दृष्टिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ चांगले काम करीत आहे. त्यांच्या या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा . असेही भाई खोत यावेळी म्हणाले.
दादासाहेब मोरे म्हणाले, पारंपारिक विद्यापीठात विद्यार्थ्यांना जितक्या सुविधा मिळतात तितक्या मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. तरीही हे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांशी अनेक क्षेत्रात स्पर्धा करतात . आणि यश मिळवितात.
शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी असले पाहिजे फक्त प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असू नये. अशी आमची धारणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. कोकणातील विद्यार्थी कला क्षेत्रात सरस असतात. हे अनेक कला महोसत्वामधून सिद्ध झाले आहे. या विभागीय महोत्सवातूनहि ते पुन्हा एकदा सिध्द होईल.असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.
विजयकुमार वळंजू म्हणाले, या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून सार्वत्रिक शिक्षण मिळेल असे प्रयत्न केले जात आहेत. हे खूप चांगले आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासले जातील यासाठी हा युवक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशा उपक्रमाना आमचे नेहमीच सहकार्य राहील .
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले. आभार प्रा. कांबळे यांनी मानले. पखवाज वादक शाम तांबे तसेच स्पर्धेचे परीक्षक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
विविध कला प्रकारांचे सादरीकरण !
युवक महोत्सवाच्या उदघाटनानंतर नृत्य, गायन, वादन अशा 32 विविध कला प्रकारांचे सादरिकरण स्पर्धकानी केले. कोल्हापृर, सांगली, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धक यावेळी उपस्थित होते.