शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
By admin | Published: June 26, 2015 01:00 AM2015-06-26T01:00:09+5:302015-06-26T01:00:09+5:30
१४१ वी जयंती : शहरातून भव्य मिरवणूक
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४१ वी जयंती आज, शुक्रवारी जिल्ह्यात उत्साहात साजरी होत आहे. व्याख्यान, शाहूंच्या दुर्मीळ ऐतिहासिक कागदपत्रांसह छायाचित्रांचे प्रदर्शन, पुरस्कार वितरण, भव्य मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. यानंतर दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पालकमंत्री पाटील अभिवादन करणार आहेत. दुपारी जिल्हा परिषदेतर्फे राजर्षी शाहू महाराज शिक्षण समृद्धी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तर सायंकाळी ५.४५ वाजता राज्याच्या पुराभिलेख संचालनालयातर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रे व कागदपत्रांचे प्रदर्शन होणार आहे. ५.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘राजर्षी शाहू पुरस्कार-२०१५’ वितरण सोहळा आयोजित केला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीतर्फे दुपारी ३ वाजता लक्ष्मी विलास पॅलेस, शाहू जन्मस्थळ, कसबा बावडा येथे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील यांचे ‘महामानवांचे विचार आणि समाज परिवर्तन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)तर्फे येथील विभागीय कार्यालयात सकाळी ११.३० वाजता राजर्षी शाहूंच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम होणार आहे.