आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारपासून विविध कार्यक्रम
By admin | Published: April 8, 2017 05:45 PM2017-04-08T17:45:27+5:302017-04-08T17:45:27+5:30
महोत्सव समितीतर्फे आयोजन, शोभायात्रेने प्रारंभ
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त मंगळवार (दि.११)पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भिम महोत्सवांतर्गत विविध मान्यवरांच्या व्याख्यानांबरोबरच शहरातून भव्य शोभायात्राही काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सखाराम कामत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कामत म्हणाले, महामानवांच्या एकत्र येऊन जयंती साजरी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक ऐक्य व सलोखा प्रस्थापित करणे तसेच राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी जयंती समिती सातत्याने प्रयत्न करत आहे.
ते पुढे म्हणाले, बिंदू चौक येथे मंगळवारी (दि.११) भिम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महापौर हसिना फरास यांच्या होणार आहे. त्याचबरोब मंगळवार ते गुरुवार (दि.१३) या कालावधित विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. शुक्रवारी (दि.१४) मुख्य जयंती सोहळ्यात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन शाहू छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधिक्षक महादेव तांबडे, समाज कल्याण आयुक्त विजयकुमार गायकवाड आदी मान्यवरांची राहणार आहे.
२३ एप्रिलला दुपारी ३ वाजता दसरा चौक येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे व प्रज्ञा दया पवार यांची राहणर आहे. यानंतर प्रा. कवाडे व प्रज्ञा पवार यांचे मार्गदर्शन होणार आहे.
यावेळी सचिव टी. एस. कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, अॅड.पंडितराव सडोलीकर, अनंत मांडुकलीकर, सुभाष देसाई आदी उपस्थित होते.