वारणा बझार फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:43 AM2018-10-30T00:43:48+5:302018-10-30T00:43:53+5:30
पेठवडगाव : येथील वारणा बझारच्या डिपार्टमेंट स्टोअर्समधील लॉकरच्या दरवाजाचा पत्रा ग्रार्इंडरने कापून चोरट्यांनी सोमवारी पहाटे १८ लाखांची रोकड लंपास ...
पेठवडगाव : येथील वारणा बझारच्या डिपार्टमेंट स्टोअर्समधील लॉकरच्या दरवाजाचा पत्रा ग्रार्इंडरने कापून चोरट्यांनी सोमवारी पहाटे १८ लाखांची रोकड लंपास केली. चार सुरक्षारक्षक असतानाही चोरट्यांनी आत प्रवेश कसा केला, ते बाहेर कसे गेले याबाबत गूढ असून, या चोरीमुळे पोलीस यंत्रणा चक्रावली आहे.
याबाबतची फिर्याद रावसो मलकान्ना घेवारी (रा. अंबप) यांनी दिली आहे. रात्री कामावर असणाऱ्या चार सुरक्षारक्षकांकडे पोलीस रात्री उशिरापर्यंत चौकशी करत होते. मात्र, ठोस धागेदोरे मिळाले नाहीत. तपासासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव-लाटवडे रस्त्यावर वारणा बझारचे अद्यावत डिपार्टमेंट स्टोअर्स आहे. या शाखेसह परिसरातील अन्य शाखांमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी असल्यामुळे मोठी रक्कम जमा झाली होती. शनिवार व रविवारी बँकांना सुट्टी असल्यामुळे इस्लामपूर, किणी, खोची, दानोळी, आदी बारा शाखांची २० लाख १८ हजार १६६ रुपये इतकी रक्कम पेठवडगाव शाखेत ठेवण्यात आली होती. या शाखेतील तळमजल्यावर एक व पहिल्या मजल्यावर एक लॉकर आहे. यातील तळमजल्यावरील लॉकरमध्ये २० लाख, तर पहिल्या मजल्यावरील लॉकरमध्ये सुमारे २० लाख रुपये ठेवले होते. ही रक्कम पेठवडगाव शाखेसह अन्य शाखेतील होती. रविवारी रात्री हा बझार रात्री आठच्या सुमारास ग्राहकांना बंद करण्यात आला. त्यानंतर नऊ वाजता कर्मचाºयांनी कुलपे घातली. यातील एक किल्ली कॅशियर व एक किल्ली मॅनेजरकडे असते. चोरी झाली त्या रात्री बाबासो नांगरे, राजेंद्र पाटील, धनंजय कुंभार, आदी सुरक्षारक्षक कामावर होते.
सोमवारी पहाटे चोरट्यांनी लॉकरच्या दाराचा सुमारे एक सेंटीमीटर जाड असणारा पत्रा ग्राइंडरने कापून फट तयार केली. या फटीतून सुमारे १८ लाख १३ हजार ४६६ रुपये लंपास केले. यातील दोन लाख चार हजार सातशे रुपये त्यांना काढता आले नाहीत. दरम्यान, चोरटे तळमजल्याकडे न गेल्याने तेथे ठेवलेली २० लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक आसमा मुल्ला, विकास माने, बालाजी घोळवे, दादा माने, संदीप गायकवाड, रणवीर जाधव, नंदकुमार घुगरे, विशाल हुबाले, आदींनी धाव घेतली. घटनास्थळी ठसेतज्ञ्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. पुणेकर यांना लॉकरवर एक ठसा मिळाला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी भेट देऊन तपासासाठी सूचना केल्या. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आदींच्या पथकांनी तपासण्यासाठी मदत केली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करीत आहेत.