वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सोमवारी बैठक: यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:03 PM2020-02-21T14:03:30+5:302020-02-21T14:05:16+5:30
वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरावरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी येथे दिले. तसेच मंत्रालय पातळीवर बैठक घ्यावी लागत असेल, तरा डॉ. भारत पाटणकर यांच्याशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरावरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी येथे दिले. तसेच मंत्रालय पातळीवर बैठक घ्यावी लागत असेल, तरा डॉ. भारत पाटणकर यांच्याशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्याने वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार (दि. १८) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ते गुरुवारी तिसऱ्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी मंत्री यड्रावकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील व नजीर चौगुले यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात माहिती दिली. तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक होऊन बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले होते; परंतु याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री यड्रावकर यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला; परंतु ते बैठकीनिमित्त पुण्यात गेले असल्याने त्यांच्यासोबत गुरुवारी बैठक होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून सोमवारी (दि.२४) जिल्हास्तरावरील प्रश्नांसंदर्भात बैठक घेतली जाईल, असे यड्रावकर यांनी सांगितले. तसेच मंत्रालयीन स्तरावरील प्रश्नांसंदर्भात बैठक घेण्याची आवश्यकता असल्यास भारत पाटणकर यांच्याशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या मतदारसंघात धरणग्रस्तांच्या वसाहती असल्याने त्यांच्या समस्यांची जाण आपल्याला आहे. त्यामुळे आपण या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडूनही त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे नेते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन धरणग्रस्तांना पाठिंबा व्यक्त केला.
आंदोलनात डी. के. बोडके, नजीर चौगले, शंकर पाटील, पांडुरंग पोवार, वसंत पाटील, अशोेक पाटील, पांडुरंग कोठारी, आनंदा आमकर, हौसाबाई घोलप, अनिता पवार, सविता पाटील, आदी सहभागी झाले होते.