वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थागित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:49 AM2020-02-25T11:49:56+5:302020-02-25T11:52:16+5:30
कोल्हापूर : वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत सोमवारी तब्बल पाच तास झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यापुढे ...
कोल्हापूर : वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत सोमवारी तब्बल पाच तास झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यापुढे दर महिन्याला बैठक घेऊन पुढील सहा महिन्यांत सर्व प्रश्न मार्गी लावू, असे सकारात्मक आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाशी संबंधित असणाऱ्या ७५ टक्के मागण्या महिन्यात पूर्ण न झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.
वारणा धरणग्रस्त, चांदोली अभयारण्यग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक घेतली. डॉ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनींपैकी ताबा न दिलेल्या जमिनींचा गावनिहाय आढावा घेण्यात आला.
तीन दिवसांत ३० प्रकल्पग्रस्तांच्या नावे सातबारा
प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्या सोडविणे सोपे असताना गेल्या ४० वर्षांपासून का रखडल्या हे समजत नाही. प्रशासन प्रमुख म्हणून त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप केले. मात्र, सातबारा नावावर झाले नाहीत.
गेल्या तीन दिवसांत सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनी सुटीदिवशी कामाला येऊन हातकणंगले, चावरे येथील ३० प्रकल्पग्रस्तांच्या नावे सातबारा केल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. यावेळी आंदोलनस्थळी संबंधितांना सातबाऱ्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या नावे १५ दिवसांत सातबारा केला जाणार असल्याची ग्वाही देसाई यांनी दिली.
आंदोलनस्थळी बसणारे दौलत देसाई पहिलेच जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो प्रकल्पग्रस्त थंडी, ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्याची दखल घेत बुधवारी आंदोलनस्थळी भेट दिली होती. मी तुमच्यापैकीच एक असून आंदोलन स्थागित करण्याची त्यावेळी विनंतीही केली.
जिल्हाधिकारी देसाई सोमवारी पुन्हा बैठक झाल्यानंतर आंदोलनस्थळी जाऊन आंदोलन स्थागित करण्याची विनंती केली. त्यावर डॉ. भारत पाटणकर यांनी गेल्या ३० वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन करत आहे. आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांमध्ये बसणारे दौलत देसाई हे पहिले जिल्हाधिकारी आहेत, असे आवर्जुन सांगितले.
तुमचेही कुटुंब असेल आता घरी जा : जिल्हाधिकाऱ्यांचे भावनिक आवाहन
मीही शेतकऱ्यांचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दु:खे मला माहीत आहे. प्रकल्पग्रस्तांशी आपले भावनिक नाते निर्माण झाले आहे. तुमचे हाल पाहवत नाहीत म्हणून चार दिवसांपूर्वीही आलो होतो. येथून पुढे कदापिही तुमची कामे मागे ठेवणार नाही. गेल्या सात दिवसांपासून तुम्ही येथे आहात. तुमचेही कुटुंब आहे, आता घरी परत जा, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी भावनिक आवाहन केले.
सहा महिन्यांत ९० टक्के प्रश्न मार्गी लावू
प्रकल्पग्रस्तांचे बहुतांशी प्रश्न सोडविणे सहज शक्य आहेत. मात्र, काही प्रश्न राज्य शासनाच्या धोरणांवर अवलंबून आहेत. जिल्हा प्रशासनाशी संबंधित असणारे प्रश्न सहा महिन्यांत मार्गी लावू. प्रत्येक महिन्यात बैठक घेऊ. उर्वरीत १० टक्के प्रश्न सोडविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.