वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत ठिय्या सुरू, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 04:36 PM2020-02-18T16:36:13+5:302020-02-18T16:38:17+5:30
वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून बैठका घेऊन ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात निर्णय झाले. परंतु त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी येथे दिला.
कोल्हापूर : वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून बैठका घेऊन ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात निर्णय झाले. परंतु त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी येथे दिला.
तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक होऊन बहुतांश प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले होते. परंतु यावेळी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्याच्या निषेधार्थ स्थगित केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले. तत्पूर्वी टाऊन हॉल उद्यान येथून दुपारी बारा वाजता डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाला सुरुवात झाली.
मोर्चात सहभागी प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. महिलांची संख्या लक्षणीय होती. सीपीआर चौक, दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंपमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक होऊनही ठोस निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत एकही आंदोलक इथून हटणार नाहीत.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगले, शंकर पाटील, पांडुरंग पोवार, वसंत पाटील, अशोेक पाटील, पांडुरंग कोठारी, आनंदा आमकर, शामराव कोठारी, राजाराम पाटील, सुरेश पाटील, हौसाबाई घोलप, अनिता पवार, सविता पाटील, आदी सहभागी झाले होते.