वारणा, कृष्णेला पुराचा धोका
By admin | Published: August 7, 2016 01:10 AM2016-08-07T01:10:12+5:302016-08-07T01:10:26+5:30
सांगलीत पाणीपातळी ३२ फुटांवर : शिराळ्यातील चार पूल पाण्याखाली; पावसाचा जोर कायम
सांगली : चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासांत १०३ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणाचे चारही दरवाजे शनिवारी सायंकाळी दोन मीटरने उचलून २५ हजार क्युसेकने विसर्ग वारणा नदीत सोडला आहे. त्यामुळे मांगले-काखेसह चार पूल पाण्याखाली गेले. सातारा जिल्ह्यातील धोम आणि कण्हेर धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडले आहे. आज, रविवारी कोयना धरणाचेही दरवाजे उचलण्यात येणार असल्याने कृष्णेला पूर येण्याची शक्यता आहे. सायंकाळी औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त मंदिरात कृष्णेचे पाणी शिरले. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणी पातळी रात्री आठला ३२ फुटांवर पोहोचली होती.
शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. शिराळा आणि इस्लामपूर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असल्यामुळे धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे २५ हजार क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे.
कोयनेचे दरवाजे उघडणार
सातारा जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून, कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील २,१११ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. कोयनेचे सहा वक्री दरवाजे आज, रविवारी दुपारी दोन वाजता तीन फुटांनी उघडून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
श्रीक्षेत्र औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त मंदिरामध्ये शनिवारी १० दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा कृष्णा नदीचे पाणी शिरले. त्यामुळे सकाळी खालच्या मंदिरातून देव वरच्या जुन्या मंदिरामध्ये हलविण्यात आले.