वारणा दूध संघाची निवडणूक बिनविरोध
By admin | Published: December 6, 2015 12:45 AM2015-12-06T00:45:03+5:302015-12-06T01:38:17+5:30
सलग आठव्यांदा बिनविरोध : आठ नवीन चेहऱ्यांना संधी, विद्यमान अकरा संचालकांना डच्चू
वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २१ जणांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने वारणा समूहाचे नेते व माजी मंत्री विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली वारणा दूध संघाची ही निवडणूक सलग आठव्यांदा बिनविरोध झाली. संघाच्या या संचालक मंडळात आठ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, संचालक मंडळातील विद्यमान अकरा संचालकांना वगळण्यात आले आहे.
तात्यासाहेब कोरेनगर (ता. पन्हाळा) येथील श्री वारणा दूध उत्पादक संघाची सन २०१५-२०२० या सालासाठीची ही पंचवार्षिक निवडणूक मल्टिस्टेट को-आॅप. अॅक्ट २००२ अन्वये नियमाप्रमाणे घेण्यात आली. ‘वारणा दूध संघ’ हा बहुराज्यीय संघ आहे. संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघारीसाठी शनिवारचा शेवटचा दिवस होता. माघारीनंतर बिनविरोध निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर बिनविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा मल्टिस्टेट अॅक्टप्रमाणे सोमवारी (दि. ७ डिसेंबर) दुपारी एक वाजता संघ कार्यस्थळावर बोलविलेल्या सभेत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड़ अभिजित परमणे यांनी दिली.
वारणा दूध संघाच्या या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी एकूण ५७ अर्ज दाखल झाले होते. छाननीच्या प्रक्रियेत पाच अर्ज अवैध ठरले, तर ५२ अर्ज वैध ठरले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ३१ जणांनी माघार घेतल्याने २१ जागांसाठी २१ जणांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
बिनविरोध संचालक असे : उत्पादक सभासद ‘अ’ वर्ग - (१३ जागा), विनय विलासराव कोरे (वारणानगर), अरुण बाबासाहेब पाटील (कुंभोज), हिंदुराव रंगराव जाधव (बहिरेवाडी), शिवाजी रामचंद्र कापरे (कोडोली), आनंदराव धोंडिराम घाटगे (आरळे), अभिजित शिवाजीराव पाटील (चिकुर्डे), दीपकराव आनंदराव पाटील (खोची), बाळासो दादू पाटील (वाठार तर्फ उदगांव), राजाराम महादेव देशमुख-चौगुले (नवे पारगांव), नेमगोंडा रायगोंडा पाटील (किणी), महेंद्र बजरंग शिंदे (वाठार तर्फ वडगाव), मोहन ज्ञानू मगदूम (कोरेगांव), लालासोा आनंदराव पाटील (तांदूळवाडी). संस्था सभासद प्रतिनिधी ब-वर्ग (२ जागा), जालिंदर रावसो पाटील (वशी), राजवर्धन हंबीरराव मोहिते (घुणकी). ग्राहक सभासद प्रतिनिधी - क वर्ग (२ जागा), भाऊसाहेब राजाराम गुळवणी (तळसंदे), शिवाजी आकाराम मोरे (मोहरे). अनु. जाती/ जमाती प्रतिनिधी, आनंदराव हणमंत कुरणे (कोडोली), शिवाजी महादेव जंगम (जाखले). महिला प्रतिनिधी (२ जागा), शोभा प्रकाश पाटील (कांदे), शोभा अनिल साखरपे (कोडोली). (वार्ताहर)