वारणा योजना दानोळीतूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:51 AM2019-03-05T00:51:10+5:302019-03-05T00:51:15+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठ्याकरीता मंजूर झालेली वारणा पाणी योजना दानोळी (ता. शिरोळ) येथूनच होणार ...
कोल्हापूर : राज्य शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठ्याकरीता मंजूर झालेली वारणा पाणी योजना दानोळी (ता. शिरोळ) येथूनच होणार आहे. याबाबत दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिले.
शासकीय विश्रामगृह येथे वारणा पाणी योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश हाळवणकर, इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी आमदार अशोक जांभळे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संगीता आलासे, मुख्याधिकारी दीपक पाटील आदींची होती.
इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ७० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सुरुवातीला दानोळीतून या योजनेला मंजुरी मिळाली आहे; परंतु या ठिकाणी विरोध होऊ लागल्याने कोथळी येथे पर्याय निवडून सर्व्हेच्या कामाला सुरुवात झाली; परंतु त्या ठिकाणीही विरोध होऊ लागला. आठ महिने झाले तरी कोणताही निर्णय होत नाही. प्रत्येक जण आपापले घोडे दामटत आहे.
शहराची वस्ती चार लाखांवर गेली आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरात आठवड्याने पाणी येत आहे. त्यामुळे ही योजना लवकर झाल्याशिवाय पर्याय नाही; अन्यथा नागरिक आम्हाला बसू देणार नाहीत, अशा भावना पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
यावर पालकमंत्र्यांनी पूर्वी मंजूर असलेल्या दानोळीतूनच ही योजना सुरू करावी, तसेच याची दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिले. त्यानुसार दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करुन पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
यावेळी ताराराणी आघाडी पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, नगरसेविका गीता भोसले, नगरसेवक युवराज माळी, अजित जाधव, रवींद्र माने आदी उपस्थित होते.
योजना कदापि होऊ देणार नाही : धनवडे
इचलकरंजीच्या राजकारण्यांना जनतेला शुद्ध पाणी द्यायचे नाही, फक्त शुद्ध पाण्याच्या नावावर राजकारण करायचे आहे. यापूर्वी मंत्रालयामध्ये पालकमंत्र्यांसोबतच ही योजना दानोळीतून रद्द करण्यात आली होती. आणि यासाठी पुन्हा दानोळीचे नाव पालकमंत्री घेत आहेत. हा निवडणुकीचा फंडा असून बाकी काही नाही. निवडणुका तोंडावर आल्याने योजनेच्या नावावर आपली पोळी भाजण्याचा प्रकार आहे. या योजनेचा निधी गेला आहे, कसलीही प्रशासकीय मंजुरी नाही, यापुढे या योजनेसाठी दानोळीचे नाव घेऊ नये, असा इशारा वारणा बचाव कृती समितीचे महादेव धनवडे यांनी दिला.
महादेव धनवडे
अध्यक्ष, वारणा बचाव कृती समिती दानोळी