वरुणराजाच्या साक्षीने रंगला कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 09:15 PM2017-09-30T21:15:24+5:302017-09-30T22:35:03+5:30

तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती, आणि गुरूमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली मानवंदना, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमी पूजन आणि दुर्गेची आरती सुरू असतानाच सुरू झालेल्या पावसाच्या साक्षीने शनिवारी कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा साजरा झाला

Varunaraja's testimony shows the Shahi Dasara ceremony in Kolhapur | वरुणराजाच्या साक्षीने रंगला कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा

वरुणराजाच्या साक्षीने रंगला कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा

googlenewsNext

कोल्हापूर - तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती, आणि गुरूमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली मानवंदना, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमी पूजन आणि दुर्गेची आरती सुरू असतानाच सुरू झालेल्या पावसाच्या साक्षीने शनिवारी कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा साजरा झाला. सोनं घ्या सोन्यासारखं रहा असे सांगत कोल्हापूरकरांनी दस-याचा आनंद लुटला. 
असूरांचा संहार करणारी साडेतीन शक्तीपीठातील देवता करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता विजयादशमीला सीमोल्लंघनाने झाली. ईश्वरी सत्ता आणि कोल्हापूर संस्थान सत्तेचा अनोखा मेळ साधणारा शाही सीमोल्लंघन सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात रंगला.

आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार...घोडेस्वार ...अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीच्या उत्सवमूर्ती, कोल्हापूर संस्थानचे शाहू छत्रपती खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशस्विनीराजे, यशराजराजे यांच्या हस्ते शमी पूजन झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, महापौर हसिना फरास, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडीक विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, संजय डी. पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलीस उपअधीक्षक सुहेल शर्मा, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. देवानंद शिंदे, तसेच सरदार घराण्याचे मानकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. 

म्हैसूर ग्वाल्हेरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रसिद्ध आहे. सायंकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची आणि तुळजाभवानी देवी व गुरुमहाराजांच्या पालख्या आपल्या लव्याजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान झाल्या. दरम्यान,शाहू महाराजांचेदेखील मेबॅक गाडीतून सोहळास्थळी आगमन झाले. येथे पोलिस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती सुरू झाली आणि जोरदार सरींनी पावसाला सुरुवात झाली. या पावसात शाहू छत्रपतींनी देवीची आरती व शमी पूजन केले. मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिला. अंबाबाईची पालखी आपल्या लव्या-जम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदीघाट, गंगावेश, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली. 

अंबाबाईची रथातील पूजा 
आठ दिवस महिषासूराशी घनघोर युद्ध करून विजय मिळविलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवी रथात बसून जाते, असा या मागचा अन्वयार्थ आहे. 

मेबॅकमध्ये नवी पिढी स्वार
दरवर्षी साजरा होणा-या दसरा सोहळ्यासाठी शाहू छत्रपती, संभाजीराजे, मालोजीराजे मेबॅक कारमधून दसरा चौकात येतात. यंदा मात्र शाहू महाराजांसोबत शहाजीराजे, यशराजराजे व यशस्विनीराजे या कारमधून सोहळ्याला आल्या. त्यांच्या मागील वाहनातून संभाजीराजे व मालोजीराजे आले. 

Web Title: Varunaraja's testimony shows the Shahi Dasara ceremony in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.