आजरा कारखाना अध्यक्षपदी वसंत धुरे, उपाध्यक्षपदी मधुकर देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:24 PM2023-12-28T14:24:12+5:302023-12-28T14:25:14+5:30
सदाशिव मोरे आजरा : आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंत धुरे ( उत्तुर ) तर उपाध्यक्षपदी मधुकर उर्फ एम.के. देसाई ...
सदाशिव मोरे
आजरा : आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंत धुरे ( उत्तुर ) तर उपाध्यक्षपदी मधुकर उर्फ एम.के. देसाई ( सरोळी ) यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीचे अध्यक्षस्थानी साखर सहसंचालक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे होते.
साखर कारखान्याच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली रवळनाथ विकास आघाडीने २० पैकी १९ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यानंतर सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी कागल येथे नूतन संचालकांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी मुलाखती झाल्या. यामध्ये निवडीचे अधिकार मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
आज सकाळी मंत्री मुश्रीफ यांनी बंद लिफाफ्यातून अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई व संग्राम कुपेकर यांच्याकडे दिली. कारखाना कार्यस्थळावर सर्व संचालक दुपारी १२ वाजता अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. त्या ठिकाणी बंद पाकीट उघडून अध्यक्ष उपाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी वसंत धुरे यांचे नाव मुकुंद देसाई यांनी सुचविले त्यास उदय पवार यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी मधुकर देसाई यांचे नाव विष्णू केसरकर यांनी सुचविले त्यास अनिल फडके यांनी अनुमोदन दिले.निवडीनंतर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.