‘वसंतदादा’ने दोन कोटी सोळा लाख भरले!
By admin | Published: November 30, 2015 11:06 PM2015-11-30T23:06:20+5:302015-12-01T00:10:57+5:30
जिल्हा बँक : बँक गॅरंटी शुल्काच्या व्यवहाराबाबत कमालीची गोपनीयता; तडजोड झाल्याची चर्चा
सांगली : सव्वाचार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात सर्वात कळीचा बनलेला वसंतदादा साखर कारखान्याच्या जिल्हा बँक गॅरंटीचा मुद्दा आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. कारखान्याने बँकेकडे २ कोटी १६ लाख रुपये भरल्याची माहिती सूत्रांनी दिली. संचालकांमध्ये झालेल्या अलिखित सामंजस्य करारांतर्गत ही तडजोड झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावरून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास बगॅसवर आधारित १२.५ मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारायचा होता. हुडको (हाऊसिंग अॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट कार्पोरेशन) मार्फत कारखान्याला ३0 कोटी ३२ लाख ८३ हजारांचा कर्ज पुरवठा करण्यात येणार होता. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हुडकोला ४३ कोटी ३१ लाख रुपयांची बँक गॅरंटी दिली होती. जिल्हा बँकेनेही याच रकमेत काऊंटर गॅरंटी दिली होती. गॅरंटीपोटी १ टक्का राज्य बँकेस व १ टक्का जिल्हा बँकेस गॅरंटी चार्जेसची रक्कम मिळाली होती. जिल्हा बँकेस गॅरंटी फी म्हणून एकूण २ कोटी १६ लाख ५५ हजार रुपये मिळाले होते. राज्य बँकेलाही तेवढीच फी मिळाली होती. हुडकोने ३ मार्च २00६ रोजी हा प्रकल्प रद्द केला. त्यानंतर लगेचच १३ मार्च २00६ रोजी कारखान्याने, प्रकल्प रद्द झाल्याने गॅरंटी चार्जेसची रक्कम परत करण्याविषयीचे पत्र जिल्हा तसेच राज्य बँकेला पाठविले. राज्य बँकेने २७ जून २00६ रोजी २ कोटी १६ लाख रुपये गॅरंटी फीची रक्कम जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा केली. त्यानंतर कारखान्याने जिल्हा बँकेकडेसुद्धाफी परत करण्याची मागणी केली. हा विषय २९ मार्च २00६ च्या संचालक मंडळाच्या सभेत ठेवण्यात आला. त्यावेळी सादर झालेली कार्यालयीन टिपणी, तसेच वकील पॅनेलने दिलेला सल्ला विचारात न घेता, संचालक मंडळाने ही रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २0 एप्रिल २00६ रोजी ही रक्कम कारखान्याला देण्यात आली.
जिल्हा बँकेच्या ४ कोटी १८ लाख १६ हजार रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात हाच गॅरंटी शुल्काचा मुद्दा कळीचा बनला आहे. सर्वात मोठी रक्कम असल्याने एवढ्या रकमेचा बोजा कमी करण्यासाठी काही विद्यमान संचालकांनी प्रयत्न केले. वसंतदादा कारखान्यास कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात काहींनी कारखान्याकडून शुल्काची रक्कम परत करण्याची तडजोड केल्याची चर्चा होती. त्यानुसारच कारखान्याकडून ही रक्कम सोमवारी भरण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत सर्वच स्तरावर गोपनीयता बाळगली होती. काही संचालकांनी याला दुजोरा दिला असला तरी प्रशासकीय पातळीवरून दुजोरा मिळू शकला नाही. (प्रतिनिधी)
क्षणात बदलले राजकारण...
वसंतदादा कारखान्याला बँक गॅरंटीपोटी दिलेले २ कोटी १६ लाख रुपये तत्कालीन संचालकांना अडचणीचे ठरले आहेत. या गोष्टीचा ठपका असलेल्या लोकांमध्ये काही विद्यमान संचालकही आहेत. त्यामुळे त्यांनी कारखाना अध्यक्ष व बँकेचे संचालक विशाल पाटील यांच्याकडे २ कोटी १६ लाख रुपये भरण्याची मागणी केली होती. ही रक्कम भरण्याच्या तयारीपोटी ९ कोटी ८६ लाखांचे कर्ज मंजूर करण्याची तडजोड झाल्याची चर्चा बँकेत काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे या कर्ज प्रकरणाचे काही संचालकांनी ताकदीने समर्थन केले. या प्रकरणावरून जिल्हा बॅँकेतील राजकीय समीकरणही बदलले आहे.
पुन्हा होऊ शकतो दावा
राज्य बँकेने कारखान्यास गॅरंटी शुल्काची रक्कम परत केली असल्यामुळे जिल्हा बॅँकेकडे पुन्हा या रकमेसाठी राज्य बॅँकेचा दाखला देऊन मागणी केली जाऊ शकते.
माहितीबाबत गोपनीयता
बँक गॅरंटी शुल्काबाबत कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याबाबत आपणास कोणतीही कल्पना नाही. पैसे भरणार किंवा नाही, या गोष्टी सांगू शकत नाही. हा भाग प्रशासकीय गोपनीयतेचा असल्याने याविषयी कोणतीही माहिती आपण देऊ शकत नाही.