‘वसंतदादा’ची डिस्टिलरीसह निविदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2017 11:48 PM2017-04-09T23:48:57+5:302017-04-09T23:48:57+5:30
प्रक्रिया अंतिम टप्प्यात : शेतकरी, कामगारांचे निविदेकडे लक्ष
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निविदा डिस्टिलरी प्रकल्पासह प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात निविदा प्रसिद्ध होणार असून शेतकरी, सभासद, कामगार, तसेच कारखाना चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या संस्थांचे लक्ष या निविदेकडे लागले आहे.
वसंतदादा कारखान्याकडे सांगली जिल्हा बँकेची ९० कोटी ५५ लाख ४६ हजार इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यास कारखान्याने असमर्थता दर्शविल्याने बँकेने मार्चअखेरीस कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. आता कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नियमावली, अटी, शर्तींसह निविदेचा मसुदा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन दिवसात निविदा प्रसिद्ध करण्याचा जिल्हा बँकेचा प्रयत्न आहे.
कारखान्याची निविदा प्रसिद्ध करताना अनेक तांत्रिक मुद्यांचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे. कायद्यातील तरतुदींचीही पाहणी केली जात आहे. वसंतदादा कारखान्यासह डिस्टिलरीही जिल्हा बँकेच्या ताब्यात असल्याने डिस्टिलरीसह कारखान्याची निविदा प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.
वसंतदादा कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता, दहा वर्षांसाठी कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन त्यातून सर्व देणी भागविण्याची व कारखाना सुस्थितीत आणण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल का किंवा दहा वर्षांच्या कालावधीसाठी निविदेस प्रतिसाद मिळेल का?, अशा सर्व बाबींचा विचार सुरू आहे. कालावधी दहा वर्षांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. १५ किंवा २० वर्षांसाठी कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाऊ शकतो. निविदेमध्ये त्याचा उल्लेख होणार असल्याने दोन दिवसात ही बाब स्पष्ट होईल.
निविदा जाहीर करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यात येत आहे. कोणत्याही त्रुटी निविदेत राहिल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जिल्हा बँकेच्या स्तरावर अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
भाडेतत्त्वाच्या निर्णयाचा प्रवास
वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वावर अन्य कारखान्यास चालविण्यास देण्याबाबतची मागणी यापूर्वीच्या अनेक वार्षिक सभांमध्ये सभासदांनी केली होती. अध्यक्षांनीही त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. वसंतदादा कारखाना सध्या प्रचंड तोट्यात आहे. अनेक देणी थकीत आहेत. त्यामुळे अन्य सक्षम कारखान्यास हा कारखाना चालविण्यास दिल्यास, थकीत देणी भागविली जाऊ शकतात. कारखाना सुस्थितीत आल्यानंतर व करार संपल्यानंतर पुन्हा सभासदांच्या ताब्यात तो येऊ शकतो. त्यामुळेच विशाल पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र व कर्नाटकातील सक्षम कारखान्यांशी चर्चा सुरू ठेवली होती. दरम्यान, जिल्हा बँकेने थकबाकीपोटी कारवाई करून कारखाना ताब्यात घेतला असून, भाडेतत्त्वावर कारखाना चालविण्यास देण्याचा अधिकार आता जिल्हा बँकेस मिळाला आहे.
शेतकरी, कामगारांची देणी मिळणार का?
वसंतदादा कारखान्याच्या निविदा प्रक्रियेकडे शेतकरी व कामगारांचे लक्ष लागले आहे. त्यांची देणी या प्रक्रियेत मिळतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून कामगार व शेतकरी संघटनांचे नेते यासाठी आक्रमक झाले आहेत. शेतकरी व कामगारांची देणी प्राधान्याने मिळावीत, अशी मागणी आहे.