वसंतदादांचा जन्मशताब्दी कार्यक्रम निश्चित
By admin | Published: October 23, 2016 12:13 AM2016-10-23T00:13:57+5:302016-10-23T00:36:11+5:30
मुंबईत बैठक : १३ नोव्हेंबरला मुख्य कार्यक्रम; तुरुंगातील आठवणींनाही मिळणार उजाळा
सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवास सांगलीतून १३ नोव्हेंबरला सुरुवात करण्याचा निर्णय शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दादांना तुरुंगात जेथे ठेवले होते व तुरुंग फोडून जेथून त्यांनी क्रांतीची उडी घेतली, त्या जागांना भेट देऊन महोत्सव समितीचे पदाधिकारी व कॉँग्रेसचे नेते दादांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत.
महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत टिळक भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आ. मधुकरराव चव्हाण, हर्षवर्धन पाटील, खा. हुसेन दलवाई, भाई जगताप यांच्यासह सुमारे ३० पदाधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते. सांगलीतून वसंतदादांचे नातू विशाल पाटील, वसंतदादांचे सहकारी यशवंत हाप्पे आणि कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटीलही या बैठकीला उपस्थित होते. सांगलीत १३ नोव्हेंबरला दादांच्या जयंतीदिनी सकाळी दादांना सांगलीच्या कारागृहात जेथे ठेवले होते, त्या जागेला तसेच जेथून तुरुंग फोडून दादांनी उडी मारली, त्या जागेस महोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य भेट देणार आहेत. तेथे अभिवादन केल्यानंतर सकाळी दहा वाजता कृष्णाकाठी उभारण्यात आलेल्या समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर जन्मशताब्दी प्रारंभ सोहळा सुरू होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी गृहमंत्री शिवराज पाटील, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे, डॉ. डी. वाय. पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
सोहळ््यानंतर राज्यात वर्षभर महोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदेश कॉँग्रेस कमिटीने ही समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील, समन्वय म्हणून हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबईलाही कार्यक्रम
वर्षभरात पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई येथे मोठे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये सहकार परिषद, शैक्षणिक चर्चासत्र, दादांच्या जीवनावरील व्याख्याने यासह अन्य कार्यक्रमांचा समावेश आहे.