वसंतदादांच्या ‘तुरुंग’फोडीला सांगलीत उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:21 AM2017-07-25T00:21:35+5:302017-07-25T00:21:35+5:30

वसंतदादांच्या ‘तुरुंग’फोडीला सांगलीत उजाळा

Vasantdad's 'prison' blazes in Sangli | वसंतदादांच्या ‘तुरुंग’फोडीला सांगलीत उजाळा

वसंतदादांच्या ‘तुरुंग’फोडीला सांगलीत उजाळा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी सांगलीत तुरुंग फोडल्याच्या ऐतिहासिक घटनेला सोमवारी ७४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कारागृहात उजाळा देण्यात आला. स्वातंत्र्य लढ्याचे अभ्यासक प्रा. विजय कोगनोळे यांनी दादांनी तुरुंग फोडून कसे पलायन केले, याचा घटनाक्रम सांगून त्यांनी मिळविलेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
सांगली जिल्ह्यात २४ जुलै हुतात्मा दिन साजरा केला जातो. वसंतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान, ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी तुरुंग फोडून केलेले पलायन, या साऱ्या घटनांची आजच्या पिढीला तसेच कैद्यांना माहिती व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, सामाजिक कार्यकर्ते विजय कडणे, प्रमोद लाड उपस्थित होते.
प्रा. विजय कोगनोळे यांनी दादांनी तुरुंग कसा फोडला, याची माहिती दिली. ते म्हणाले की, ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी दादा व त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य सांगली जिल्हा कधीही विसरणार नाही. दादांनी तुरुंग फोडल्याच्या घटनेला आज ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. दादांसोबत अण्णासाहेब पत्रावळे, जयराम कुष्टे, बाबूराव पाचोरे, हिंदुराव पाटील, जिनपाल खोत यांच्यासह १४ स्वातंत्र्यसैनिक होते. केवळ स्वातंत्र्य मिळविण्याच्या हेतूनेच त्यांनी तुरुंग फोडण्याचा बेत आखून तो यशस्वी केला. तुरुंग फोडण्यासाठी अण्णासाहेब पत्रावळे यांची खूप मोठी मदत झाली. पुढे मग दादांना गोळी लागली. सर्वांना पकडले. तुरुंग फोडल्याचा खटला दाखल केला. सर्वांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाली. तेव्हापासून या तुरुंगात स्वातंत्र्य लढ्याच्या ऐतिहासिक खुणा आहेत. त्या जतन करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. दादा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यागातून स्वातंत्र्य मिळविले आहे.
विजय कडणे यांनी प्रास्ताविक केले. अधीक्षक सुशील कुंभार यांनी आभार मानले.
स्मृतिस्तंभास अभिवादन
तुरुंग फोडण्यात दादांसोबत असलेले स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांनी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभरीत पदार्पण केले आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांच्या आठवणीसाठी कारागृहाबाहेर स्मृतिस्तंभ उभा केला आहे. या स्तंभास कुष्टे यांनी सोमवारी सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Web Title: Vasantdad's 'prison' blazes in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.