वसंतराव घाटगे यांच्या नावाने कौशल्य विद्यापीठ व्हावे : शां. ब. मुजुमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 04:29 PM2017-09-03T16:29:47+5:302017-09-03T16:36:33+5:30

Vasantrao Ghatge's name should be a skill school: Shan B. Mujumdar | वसंतराव घाटगे यांच्या नावाने कौशल्य विद्यापीठ व्हावे : शां. ब. मुजुमदार

कोल्हापुरात रविवारी दिवंगत उद्योगपती वसंतराव घाटगे यांच्या ‘वसंतवैभव’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून वसंतराव घाटगे मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त सतीश घाटगे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ट्रस्टचे विश्वस्त मोहन घाटगे, शाहू छत्रपती, लेखक भानू काळे उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्दे‘वसंतवैभव’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशनविविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीकौशल्य विद्यापीठ कोल्हापुरात वसंतराव यांच्या नावाने सुरू व्हावे

कोल्हापूर : उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून उद्योगपती वसंतराव घाटगे यांनी कोल्हापूरचा जागतिक पातळीवर नावलौकिक केला. त्यांनी ७० वर्षांपूर्वी आपल्या व्यवसायातील कामगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविला. अशी दूरदृष्टी असलेल्या वसंतराव यांच्या नावाने कोल्हापुरात कौशल्य विद्यापीठ व्हावे. त्यासाठी घाटगे कुटुंबियांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी रविवारी येथे केले.

येथील वसंतराव घाटगे मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित दिवंगत उद्योगपती वसंतराव घाटगे यांच्या ‘वसंतवैभव’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती, तर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, चरित्रकार लेखक भानू काळे प्रमुख उपस्थित होते.

‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, वसंतराव घाटगे हे ज्ञानमार्गी होते. त्यांच्या आणि जयकुमार पाटील यांच्या मैत्रीतून कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रात सिम्बायोसिस निर्माण झाले. धीटाई, कसोटी, सचोटी, हातोटी या गुणांच्या जोरावर वसंतराव यांनी कर्तृत्व गाजविले. त्यांनी आपल्या उद्योग-व्यवसायातील सुमारे तीन हजार कामगारांसाठी ७० वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा विचार केला. आपल्या देशातील शिक्षणपद्धतीमध्ये काहीतरी चुकत आहे. नुसतीच पदवी किंवा कौशल्य असून उपयोग होत नाही. त्यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. सध्या जगात आपला देशामधील तरुणांचे प्रमाण मोठे आहे. हा लोकसंख्येचा लाभांश असून तो पुढील ४० वर्षे कायम राहणार आहे. या लाभाचे लोकसंपत्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी कौशल्य विकासाचा समावेश असणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी देशात कौशल्य विकास, प्रशिक्षण देणाºया विद्यापीठाची संख्या वाढावी. असे कौशल्य विद्यापीठ हे कोल्हापुरात वसंतराव यांच्या नावाने सुरू व्हावे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, समाजात आज ‘क्रायसिस आॅफ करेक्टर’चा मोठा प्रश्न आहे. विद्वत्ता आणि नम्रता हे दोन्ही एकाच व्यक्तिमत्त्वात असणे दुर्मिळ होत आहे. अशा स्थितीत शून्यातून विश्व निर्माण करणाºया वसंतराव घाटगे यांच्यासारख्या व्यक्तींचे चरित्र हे मार्गदर्शक ठरणारे आहे. अशी चरित्रे तरुणांसमोर येणे आवयक आहे.

शाहू छत्रपती म्हणाले, कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राला वसंतराव यांनी योग्य दिशा दिली. घाटगे कुटुंबियांची एकत्र कुटुंब पद्धती आणि उद्योग-व्यवसायातील वाटचाल आदर्शवत ठरणारी आहे. लेखक भानु काळे म्हणाले, जिद्दी, ज्ञानमार्गी असे वसंतराव घाटगे यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे कर्तृत्व प्रेरणादायी आहे. त्यांनी कामातून समाजासमोर आदर्श उभा केला.

या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, प्रकाश आवाडे, डॉ. सुलभा दाते, नलिनी देसाई, वसंतराव घाटगे मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त सतीश घाटगे, उद्योजक किरण पाटील, व्ही. बी. पाटील, आदी उपस्थित होते. अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, श्रीनिवास बिरकर यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देवीना घाटगे यांच्या गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महेश हिरेमठ यांनी अक्षरवरदान स्वागतगीत सादर केले. यानंतर प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. वसंतराव घाटगे मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त मोहन घाटगे यांनी प्रास्ताविकातून आठवणींना उजाळा दिला. शुभदा हिरमेठ यांनी सूत्रसंचालन केले. तुषार घाटगे यांनी आभार मानले.

मुजुमदार म्हणाले


*कौशल्य विकासाच्या अनुषंगाने सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल व्हावा.
* माझ्यात आणि वसंतराव यांच्यात साम्य होते. ते म्हणजे आम्ही दोघे एकाच तालुक्यातील, राजाराम महाविद्यालय व फर्ग्युसन कॉलेजमधील वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी.
*आयुष्यात दोन दिवस महत्त्वाचे असतात. यातील पहिला दिवस आपला जन्म झालेला आणि दुसरा दिवस हा आपण का? जन्मला आलो हे समजणारा.
* यातील काहींना दुसरा दिवस लवकर, तर अनेकांना समजण्यास बरेचे दिवस जातात. उद्योगपती वसंतराव यांना हा दुसरा दिवस वयाच्या २८ व्या वर्षी समजला. यानंतर त्यांनी ट्रान्सपोर्टसह विविध उद्योगात कर्तृत्व गाजविले.
 

Web Title: Vasantrao Ghatge's name should be a skill school: Shan B. Mujumdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.