वसुंधरा चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव, वसुंधरा मित्र पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:45 PM2019-10-11T12:45:12+5:302019-10-11T12:46:54+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्याबरोबरच निसर्ग व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची पावले उचलली होती. त्यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यावेळी राजे होते, आता प्रशासन आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. त्यासाठी सर्वांच्या कृतिशील पुढाकाराची गरज आहे, असे प्रतिपादन गुरुवारी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्याबरोबरच निसर्ग व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची पावले उचलली होती. त्यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यावेळी राजे होते, आता प्रशासन आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. त्यासाठी सर्वांच्या कृतिशील पुढाकाराची गरज आहे, असे प्रतिपादन गुरुवारी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
शाहू स्मारक भवनात आयोजित १० व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव व वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर आर. आर. देशपांडे, वीरेंद्र चित्राव, धीरज जाधव, शुभम चेचर, ऋतू काशीद उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. एस. व्ही. शिरोळ, डॉ. दीपक भोसले, महादेव नरके यांना वसुंधरा गौरव व छायाचित्रकार तय्यब अली, चिदंबर चिमणे व रॉबिनहूड आर्मी या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संयोगिताराजे म्हणाल्या, संस्थानकाळात राजेंचा शब्द प्रमाण मानून नागरिकांनी निसर्ग संवर्धनासाठीचे नियम पाळले. आता मात्र वर्षानुवर्षे प्रबोधन केले तरी अपेक्षित परिणाम होत नाही. त्यामुळेच काही वेळा कठोर पावले उचलावी लागतात. विशाळगडाजवळ आम्ही शिवारण्य नावाचं जंगल वसवलं आहे. एकेकाळी एकच झाड असलेल्या जमिनीवर आता दाट वनराई आहे. सर्व प्रकारचे वन्यजीव येथे येतात. प्लास्टिकच्या पिशव्यांना आम्ही कापडी पिशव्यांचा पर्याय दिला. आमच्या पातळीवर अनेक लहान-मोठी पावलं उचलत आहोत. त्याला सर्वांच्या साथीची आवश्यकता आहे.
महादेव नरके, चिदंबर चिमणे यांनी मनोगत व्यक्त केले. उदय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महोत्सवात गुरुवारी सकाळी कात्यायनी मंदिर परिसरात हेरिटेज वॉक करण्यात आला.