सेनापती कापशी कोविड केंद्रात वटपौर्णिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:52+5:302021-06-25T04:17:52+5:30
सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) येथील कोविड केंद्रात दाखल असलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह महिलांना यंदाची वटपौर्णिमा कशी साजरी ...
सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) येथील कोविड केंद्रात दाखल असलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह महिलांना यंदाची वटपौर्णिमा कशी साजरी करायची, असा मोठा प्रश्न पडला होता. शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाने वडाचे झाड व इतर सर्व साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली आणि महिलांची वटपौर्णिमा थेट कोविड केंद्राच्या मैदानावरच साजरी झाली. वटपौर्णिमेची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान कोरोनाग्रस्त महिलांच्या चेहऱ्यावर झळकत होते. महिलांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना कोरोनाला हरवण्याचा संकल्प देखील केला. या जगातून कोरोना नष्ट व्हावा अशी ओव्यांच्या माध्यमातून त्यांनी सामूहिक प्रार्थना देखील केली.
अनिता फेगडे म्हणाल्या, यावर्षीची वटपौर्णिमा होणार नाही असे येथील महिलांना वाटत होते. पण शशिकांत खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूजेचे नियोजन केले आणि आम्हाला ही पूजा करता आली. ही वटपौर्णिमा आयुष्यभर आमच्या आठवणीत राहील, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोविड केंद्राचे मुख्य शशिकांत खोत म्हणाले वटपौर्णिमा हा सण म्हणजे महिलांच्या आत्मीयतेचा सण. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मनाला आत्मिक आनंद होत आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व लोकांना समजले आहे त्यामुळे जास्तीत जास्त वडाच्या रोपांची लागण सर्वांनी करावी.
२४ सेनापती कापशी कोरोना वटपौर्णिमा
फोटो:- सेनापती कापशी (ता. कागल) येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयातील कोविड केंद्रात वटपौर्णिमा निमित्ताने वडाच्या झाडाला फे-या मारता मारता कोरोनाला हरविण्याचा संकल्प महिलांनी केला.
फोटो :- सार्थक फोटो कापशी