शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील, शाहू महाराज यांनी केली फेरनिवड
By विश्वास पाटील | Published: October 25, 2023 03:12 PM2023-10-25T15:12:42+5:302023-10-25T15:13:49+5:30
कोल्हापूर : पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. सोसायटीचे ...
कोल्हापूर : पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष शाहू महाराज यांनी सोसायटीच्या बैठकीत त्यांची ही निवड केली. या निवडीसाठी सोसायटीचे उपाध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे, संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी माजी आमदार मालोजीराजे यांचे सहकार्य व साथ लाभली असल्याचे सांगून सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचे व्ही.बी.पाटील यांनी आभार मानले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून पुणे या विद्येच्या माहेरघरात देशातील पहिली श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलची स्थापना करून सर्व समाजाच्या मुलांसाठी शैक्षणिक दालन उभे केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सुरू झालेल्या या सोसायटीचे सध्याचे शाहू महाराज यांनी इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आयटी., एमबीए अशा वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर केले आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात या संस्थेची वेगळी ओळख तयार झाली आहे.
निवडीनंतर कृतज्ञता व्यक्त करताना व्ही.बी.पाटील म्हणाले, या संस्थेत गेली वीस वर्षे काम करत असताना शाहू महाराज यांनी पुन्हा एकदा गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष करून माझ्यावर विश्र्वास व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यात अधिक समरस होण्यास प्रोत्साहन व बळ दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. शाहू महाराज यांच्या माझ्यावरील विश्वासाचा अनुभव मला या संस्थेत काम करताना पदोपदी जाणवला आहे. त्या विश्वासास पात्र राहून सोसायटीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन.