संभाजी नावाने विडीविक्री, संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने १९ लाखांचा माल परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 01:38 PM2020-08-26T13:38:28+5:302020-08-26T13:41:14+5:30
संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संभाजी विडी या नावाने तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पुण्यातील कंपनीने सुमारे १९ लाखांचा माल परत पाठवण्यात यश आले.
शिरोली : संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संभाजी विडी या नावाने तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पुण्यातील कंपनीने सुमारे १९ लाखांचा माल परत पाठवण्यात यश आले.
संभाजी विडी या नावाने पुण्याहून कोल्हापूरला विक्रीला हा माल आला होता. हे संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुमारे १९ लाखांचा माल व्यावसायिकांच्याकडून ताब्यात घेऊन ट्रान्सपोर्टने पुुन्हा पुण्याला कंपनीला पाठवला. संभाजी नावाने विडी विक्री करायची नाही, असा इशाराही संबंधित कंपनी आणि व्यावसायिकांना संघटनेने दिला आहे.
संभाजी विडी विक्री करणारी गाडी पुणे येथून गुरुवारी (दि.२० रोजी) कोल्हापूरात आली होती. ही गाडी कागल, गोकुळशिरगांव, गांधीनगर ,कोल्हापूर शहर,पेठ वडगांव, इचलकरंजी, गडडिग्लज आदी ठिकाणी व्यावसायिकांना माल टाकत शहरात स्टेशन रोडवर आली.
गाडीवर संभाजी असे नाव पाहुन संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याची चौकशी केली असता पुणे येथून संभाजी विडी घेऊन माल विक्रीसाठी आणला आहे असे संबंधित गाडी चालकाने सांगितले. यावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी व्यवस्थापनाशी बोलणं करत गाडी सोडणार नाही, असा इशारा दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विडी विकता, हे खपवून घेणार नाही. ज्या छत्रपती संभाजीराजांना कशाचही व्यसन नव्हते, त्या राजाच्या नावाने तुम्ही विडी विकता हे कोल्हापूरात चालणार नाही, गाडीतील माल परत घेऊन जा असा इशारा दिला.
यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी व्यावसायिकांना विडी विक्रीसाठी पाठवल्या होत्या, तो सुमारे पाच लाखांचा सगळा माल गोळा करून संभाजी ब्रिगेडने आलेल्या गाडीतून परत पुण्याला पाठवला. संभाजी नावाने विडी विक्री करू नये अशी विनंती संभाजी ब्रिगेडने शहरातील व्यावसायिकांना केली.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, विकी जाधव, निलेश सुतार, अभिजीत कांजर, अभिजीत भोसले, मदन परीट, उमेश जाधव,शहाबाज शेख, प्रवीण काटे आदी कार्यकर्ते सहभागी होते.
कोल्हापुरातील आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
संभाजी बिडी विरोधातील संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला सोमवारी कोल्हापुरातील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याकडील शिल्लक सर्व मालसुद्धा कंपनीला परत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे १० लाखांचा माल सोमवारी ट्रान्सपोर्टने पुण्याला परत पाठवला. जिल्हा पानपट्टी असोसिएशन यांनी सुद्धा इथून पुढे संभाजी विडीची खरेदी-विक्री करणार नसल्याचे जाहीर केले आहे. इथून पुढे भविष्यात महापुरुषाच्या नावाने असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि खरेदी करणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्याला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला चांगलाच चोप
दरम्यान, साहेब मी संघटनेची पावती फाडतो, मी ब्लॅकने माल विकतो असे म्हणणाऱ्या शहरातील व्यापाऱ्याला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.
छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय महापुरुष आहेत त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही आणि त्याच महापुरुषाच्या नावाने कोणी तंबाखूजन्य पदार्थ विकत असेल तर ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने महापुरूषांच्या नावाने येणारा माल खरेदी करू नये. आणि कोणत्याही कंपनीने महापुरूषांच्या नावाने तंबाखूजन्य माल विक्री केल्यास त्याला सडेतोड उत्तर देऊ
- रुपेश पाटील,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.