'देशी' प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा लघुपट- वीणा जामकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:57 PM2020-01-14T16:57:32+5:302020-01-14T17:00:14+5:30
‘देशी’ लघुपटाची कथा ही मनाला स्पर्श करणारी असून हा लघुपट प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे, असे मत अभिनेत्री वीणा जामकर यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : ‘देशी’ लघुपटाची कथा ही मनाला स्पर्श करणारी असून हा लघुपट प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे, असे मत अभिनेत्री वीणा जामकर यांनी व्यक्त केले.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचा ‘देशी’ हा पहिला लघुपट आहे. राजेंद्रकुमार यांची निर्मिती असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन रोहित बापू कांबळे यांनी केले आहे. या लघुपटाचे प्रदर्शन अभिनेत्री वीणा जामकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महावीर महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रसिद्ध अॅडव्होकेट सी. बी. कोरे, शासकीय अधिकारी अरविंद देसाई, चित्रपट अभ्यासिका प्रा. कविता गगराणी, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव, निर्माता राजेंद्र मोरे, दिग्दर्शक रोहित बापू कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जामकर म्हणाल्या, देशी ही भावनिक आणि हृदयस्पर्शी कलाकृती असून त्यातून मांडलेला विषय हा व्यवस्थेला दिलेली एक चपराक आहे. कोल्हापूरने कलेच्या क्षेत्रामध्ये नेहमीच वेगळेपण जपले आहे. आजही कोल्हापूरमध्ये खूप चांगले दिग्दर्शक, लेखक निर्माण होऊन त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय तयार होत आहेत, ही फारच महत्त्वाची बाब आहे.
मिलिंद यादव म्हणाले, आर्थिक पाठबळ असणारे चित्रपट क्षेत्रात अनेकजण आहेत; पण गरीब कुटुंबातील रोहित कांबळे याने देशीसारखा अंतर्मुख करायला लावणारा लघुपट बनविणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
अॅड. सी. बी. कोरे म्हणाले, देशी ही शॉर्टफिल्म नसून बिग फिल्म आहे. या लघुपटातील आशय, लोकेशन, संगीत यासह सर्वच गोष्टी या वास्तववादी आहेत. दिग्दर्शकाचा अभ्यास व प्रचंड मेहनत यामागे असल्याचे दिसून येते. कोल्हापुरातील दिग्गज कलाकारांनी कोल्हापूरची माती ही याआधीच कसदार बनविल्यामुळे या मातीमधून चांगल्याच कलाकृती निर्माण होत राहणार याची साक्ष देशी हा लघुपट देतो.
निर्माता राजेंद्र मोरे यांनी प्रारंभी स्वागत केले, तर अरविंद देसाई, अॅड. कोरे, वीणा जामकर यांच्या हस्ते लघुपटातील कलाकार, तंत्रज्ञांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. जयभीम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर चिल्लर पार्टीचे रवींद्र शिंदे यांनी आभार मानले.