Kolhapur: वीर शिवा काशीद समाधीस्थळ, परिसर नुतनीकरणाचा आराखडा तयार करा - खासदार धैर्यशील माने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 04:15 PM2024-07-13T16:15:04+5:302024-07-13T16:15:22+5:30
पन्हाळा : वीर शिवा काशीद समाधी स्थळ व परिसराच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करा, तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांसोबत ...
पन्हाळा : वीर शिवा काशीद समाधी स्थळ व परिसराच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करा, तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लागणारा निधी देतो असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले. लवकरच पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेले वीर शिवा काशीद समाधीस्थळ महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे स्मारक बनवू असेही खा. माने यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कोल्हापूर व नाभिक समाज बांधवांच्यावतीने वीर शिवा काशीद यांची ३६४ वी पुण्यतिथी पन्हाळा येथे विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. सुरवातीला शिवा काशीद समाधीस खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, समरजितसिह घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, निर्मल ग्रामप्रणेते भारत पाटील उपस्थित होते.
त्यानंतर पन्हाळा नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व पुरस्कार प्राप्त समाज बंधू भगिनीचा सत्कार करण्यात आला. प्रा.मधुकर पाटील यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान झाले. यावेळी नाभिक महामंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठया संखेने आलेल्या नाभिका समाजाच्या बंधू भगिनींनी व शिवभक्तांनी शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमाला पन्हाळा नगर माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, माजी पोलीस पाटील भीमराव काशिद, नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष सयाजी झुंझार, बाबासाहेब काशीद, मारुती टिपुगडे, मेघारणी जाधव, मोहन चव्हाण, संतोष चव्हाण, संजय रोकडे, दिपक खराडे, वीर शिवा काशीद स्मारक समितीचे व संवर्धन समितीचे पदाधिकारी तसेच शिवभक्त व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.