कोगनोळीतील सण उत्सव साजरे होणार मर्यादित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:46 PM2020-10-09T16:46:51+5:302020-10-09T16:50:08+5:30
navratri, belgaon, kolhapur, kognoli, virkumarpatil, minister कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील अंबाबाई देवीचा घटस्थापनेपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव, सीमोल्लंघन, बिरदेव यात्रा, दीपावली हे एकापाठोपाठ एक येणारे सर्व सण फक्त मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरे केले जातील.
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी -कोगनोळी येथील अंबाबाई देवीचा घटस्थापनेपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव, सीमोल्लंघन, बिरदेव यात्रा, दीपावली हे एकापाठोपाठ एक येणारे सर्व सण-उत्सव प्रति वर्षी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. परंतु या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे सण फक्त मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरे केले जातील.
नागरिकांना मंदिरात दर्शनाची मुभा असेल. नागरिकांनी सणांचा उत्साह ठेवावा पण गर्दी टाळावी व अंतर राखावे, असे मत माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी कोगनोळी येथे आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी केले. धार्मिक सणांचा उत्साह असावा परंतु सुरक्षितता बाळगणेही गरजेचे आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या आरतीनंतर तीर्थ प्रसादाचे वाटप होणार नाही. देवीच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा होईल परंतु नागरिकांनी दुरूनच दर्शन घ्यावे.
देवीच्या जागरा दिवशी पूजाविधी वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. विजयादशमीलाही मंदिरात कोणीही गर्दी करू नये. बिरदेव यात्रा काळात मेवामिठाई तसेच खेळण्याची कोणतीही दुकाने मांडली जाणार नाहीत. फक्त पूजा विधी आटोपून यात्रा संपन्न केली जाईल.
या सर्व काळात नागरिकांना दर्शनासाठी मंदिरे खुली असतील परंतु नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी न करता सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन वीरकुमार पाटील यांनी केले.
यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रकाश गायकवाड, कुमार पाटील, सुरेश गुरव, बिरसू कोळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, अशोक मगदूम, आप्पासो मगदूम, डॉ.प्रवीण मगदूम, संदीप चौगुले, नामदेव दाभाडे, युवराज कोळी, बाबासो पाटील, महेश जाधव, आप्पासाहेब माने, बाळू गुरव, साताप्पा आवटे, लक्ष्मण गाडेकर, झाकिर नाईकवाडे, मुरलीधर मेस्त्री, राजगोंडा चौगुले, प्रशांत पोवाडे, संजय डूम यांच्यासह गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, मानकरी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी आभार मानले.