घराघरांत साजरा झाला रानभाज्या महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 02:10 PM2020-08-10T14:10:21+5:302020-08-10T14:14:51+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा महोत्सव निसर्गप्रेमी नागरिकांनी स्वगृही राहून स्वतःच्या कुटुंबासमवेत साजरा केला. तसे आवाहन निसर्गमित्रतर्फे करण्यात आले होते.
कोल्हापूर :गेली १० वर्षे निसर्गमित्र परिवाराच्या वतीने रानभाज्या ओळख व संवर्धनाचे काम सातत्याने सुरू आहे. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सर्वांना कळावेत, त्यांची ओळख व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्या महोत्सव घेण्यात येतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा महोत्सव निसर्गप्रेमी नागरिकांनी स्वगृही राहून स्वतःच्या कुटुंबासमवेत साजरा केला. तसे आवाहन निसर्गमित्रतर्फे करण्यात आले होते.
यालाच प्रतिसाद देत आज, दि. ९ ऑगस्ट रोजी गिरगाव येथील मोहन जाधव यांच्या कुटुंबीयांनी स्वतः अंगणात व शेतात उगवलेल्या १० प्रकारच्या औषधी रानभाज्या निसर्गमित्रला भेट म्हणून दिल्या.
यामध्ये कस्तुरी मोहन जाधव हिने पुढाकार घेऊन ही भेट निसर्गमित्रचे अनिल चौगुले व पराग केमकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्याबद्दल कस्तुरीला निसर्गमित्रच्या वतीने औषधी रानभाज्या पुस्तक देऊन पशुवैद्यकीय अधिकारी धनाजी काटकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
हॉटेलमध्ये रानभाज्यांची भजी
गगनबावडा तालुक्यातील साळवण येथून मनोज सूर्यवंशी यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये केना व आघाडा या रानभाज्यांची भजी विक्रीला ठेवली होती, त्याचा खवय्यांनी फडशा पाडला.
घराघरात महोत्सव
बेलबाग, मंगेशकरनगर, महालक्ष्मीनगर, मंडलिक पार्क, राजारामपुरी, गिरगाव, पाचगाव, फुलेवाडी येथील निसर्गप्रेमी कुटुंबीयांनी घरच्या घरी विविध प्रकारच्या रानभाज्यांच्या रेसिपी तयार करून हा रानभाज्या महोत्सव साजरा केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन बाबा महाडिक, अलका मोहन जाधव, राणिता चौगुले, सुलभा मिरजकर, सई यादव, संगीता धामणस्कर, सुजाता पवार, ज्योतीराम पाटील या व इतर निसर्गप्रेमींनी सक्रिय सहभाग नोंदवला.