भाजीचा फणस बाजारात; भाज्या कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:52 AM2019-03-11T10:52:15+5:302019-03-11T10:54:42+5:30
कोल्हापूर शहरातील बाजारात भाजीचा फणस दाखल झाल्याने तो घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे; तर या आठवड्यात बहुतांश भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा दरांवर परिणाम झाला आहे. वांगी, गवार, कारली, दोडका, आदी भाज्यांचे दर कडाडले आहेत. दुसरीकडे, हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हरभराडाळ, पोळीच्या आट्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. हरभराडाळ ६८ रुपये, तर पोळीचा आटा ३२ रुपये प्रतिकिलो असा दर होता.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बाजारात भाजीचा फणस दाखल झाल्याने तो घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे; तर या आठवड्यात बहुतांश भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा दरांवर परिणाम झाला आहे. वांगी, गवार, कारली, दोडका, आदी भाज्यांचे दर कडाडले आहेत. दुसरीकडे, हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हरभराडाळ, पोळीच्या आट्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. हरभराडाळ ६८ रुपये, तर पोळीचा आटा ३२ रुपये प्रतिकिलो असा दर होता.
गेल्या आठवड्यात बाजारात भाज्यांची आवक जास्त होती; त्यामुळे भाज्यांचे दर कमी होते; पण या आठवड्यात वांगी, ढबू मिरची, ओला वाटाणा, कारली, दोडका, मेथीच्या दरात वाढ झाली. घाऊक बाजारात वांगी ३० रुपये, ढबू मिरची ३५ रुपये तर किरकोळ बाजारात गवार १२० रुपये, ओला वाटाणा ३० रुपये, कारली ४० रुपये, दोडका ४२ रुपये किलो होता. मात्र कोबी, ओली मिरची, घेवडा, भेंडी, वरणा, फ्लॉवरचे दर स्थिर होते.
पोकळ्याचा दर कमी झाला होता. तो पाच रुपये झाला होता. यंदा भाजीचा फणस हा २० रुपयांपासून ६० रुपयांच्या घरात होता; तर मोठा कापा फणस सुमारे १२० रुपये असा दर होता. याचबरोबर कांदा, लसूण व बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे.
घाऊक बाजारात १० किलो कांद्याचा दर ५० रुपये, बटाटा १२० रुपये; तर लसूण २५० रुपये होते. फळबाजारामध्ये द्राक्षे, अननसांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात द्राक्षे ३५ रुपयांनी होती. अननस ४० रुपये होते. तसेच आंबा हापूस पेटी दीड हजार रुपये, बॉक्स ४०० रुपये होता.
तसेच तांदूळ, गव्हाचे दर स्थिर आहेत; पण तूरडाळीच्या दरात चार रुपयांनी प्रतिकिलो वाढ होऊन ती ८८ रुपये झाली. सूर्यफुलाचे तेल ९५ वरून १०५ रुपये असे झाले आहे. दरवर्षीप्रमाणे मार्चच्या महिन्यात चटणीच्या मसाल्याला ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कोथिंबिरीची पेंढी कमी दराने
घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या पेंढीचा दर २५० रुपये शेकडा आहे; त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची पेंढी साधारणत: तीन ते पाच रुपये होती. ती घेण्यासाठी बाजारात गर्दी होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारभोगाव, करंजफेण परिसरातून भाजीचा फणस येतो. यंदा फणसाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
-अनुसया मरगळ,
फणस विके्रत्या, कोल्हापूर.