शहरातील भाजी मंडई बेमुदत बंद

By admin | Published: March 2, 2017 12:22 AM2017-03-02T00:22:58+5:302017-03-02T00:22:58+5:30

अडत विरोधात खरेदीदार आक्रमक : ज्याला अडत देणे शक्य त्यांनीच खरेदी करावी यावर प्रशासन ठाम

The vegetable market in the city is inaccessible | शहरातील भाजी मंडई बेमुदत बंद

शहरातील भाजी मंडई बेमुदत बंद

Next

कोल्हापूर : अडत देण्यास विरोध कायम ठेवत शहरातील अकरा भाजी मंडई ‘बेमुदत बंद’ ठेवण्याचा निर्णय खरेदीदारांनी आज, बुधवारी घेतला. यामुळे बाजार समिती प्रशासनाने ज्याला अडत देण्यास परवडते त्यांनीच खरेदी करावी, अशी भूमिका घेत आज, गुरुवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘लायसन्स’ (खरेदी परवाना) असणाऱ्यांनाच यापुढे भाजीपाला खरेदीस परवानगी राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
भाजीपाल्यावर ६ टक्के अडत घेण्यास खरेदीदारांचा विरोध असून, त्यांनी बुधवारी सौदे बंद पाडून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अडते, खरेदीदार व समिती प्रतिनिधींची बैठक झाली. किरकोळ भाजीपाला विक्रेते संघटनेचे राजू जाधव यांनी अडत देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. येथे येणारा ९० टक्के माल हा परजिल्ह्यांतून येतो, शेतकऱ्यांचा अडतीला विरोध नसताना वसुली का करता? कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात बाजारात भाजीपाला येतो, त्यांच्या स्पर्धेत अडत देऊन टिकू शकत नसल्याचे राजेंद्र लायकर यांनी सांगितले. कायद्यानेच आम्ही अडत घेत असून, जर खरेदीदारांना द्यायची नसेल तर ती कोणाकडून घ्यायची, अशी विचारणा अडते जमीर बागवान यांनी केली. भगवान काटे म्हणाले, तुमची झुंडशाही खपवून घेणार नाही, समितीत शेतकऱ्यांना कोणी पुन्हा अडविण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर देऊ. यावर हरकत घेत विलास मेढे म्हणाले, येथे सर्व माल शेतकऱ्यांचा येत नाही. अडत्यांनी बाहेरून मागविलेल्या मालाला अडत का घेता? फळ मार्केटमध्ये कोणाकडून अडत घेता? सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही.
शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करण्यासाठी समितीत जागा उपलब्ध करून दिली आहे; पण आमच्या उघड व पारदर्शक सौदा प्रक्रियेमुळे शेतकरी आमच्याकडेच येतात. तुम्हाला जसे परवडते, तसा माल मागून घ्या, असे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. सौदे सुरू करण्याचे आवाहन सभापती सर्जेराव पाटील यांनी केले. खरेदीदारांची पुन्हा बैठक झाली. त्यामध्ये अडतीवर ते ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली.
आज, गुरुवारपासून शहरातील अकरा भाजी मंडई बंद ठेवून सहाव्या दिवसांपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा राजू जाधव यांनी दिला. तुम्ही खरेदी करू नका; पण सौद्यात कोणी त्रास दिला तर खपवून घेणार नसल्याचा इशारा सभापती पाटील यांनी दिला. यावेळी शहर उपनिबंधक संभाजी निकम, सहायक निबंधक सुनील धायगुडे, विलास साठे, कृष्णात पाटील, उदय पाटील, बाबा लाड, मोहन सालपे यांनी चर्चेत भाग घेतला.


भाजीपाला खरेदीदारांनी पाडले सौदे बंद
आजपासून सौदे सुरू करण्याचा समितीचा निर्णय


गाड्यांची हवा सोडली; ४० लाखांचा माल पडून
कोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांनी अडतीला विरोध करीत बुधवारी सौदे बंद पाडले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडून जोरदार गोंधळ केल्याने समितीतील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर खरेदीदारांनी नमती भूमिका घेतली; पण दिवसभर समितीत सुमारे ४० लाखांचा भाजीपाला पडून राहिला.
भाजीपाल्यावर खरेदीदारांकडून आकारल्या जात असलेल्या सहा टक्के अडतीवरून हा गोंधळ सुरू आहे. बुधवारी पहाटे अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केले. समितीमध्ये पहाटेपासून भाजीपाल्याची आवक-जावक सुरू असते. कोकणात पहाटेच माल पाठविला जातो. तो रोखून सकाळी सौदे काढू दिले नाहीत. बाहेरून भाजी खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनाही या खरेदीदारांनी रोखले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडल्याने तणाव निर्माण झाला. समितीचे उपसचिव मोहन सालपे, भगवान काटे यांनी खरेदीदारांना समजावून समितीच्या आवाराबाहेर घालविले. तरीही काही खरेदीदारांनी गोंधळ करण्यास सुरू केल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले.
दरम्यान, समितीत नेहमीप्रमाणे भाजीपाल्याची दोन हजार क्विंटल आवक झाली होती. त्याचा सौदा निघाला नाहीच; पण मालही समितीत दिवसभर पडून होता. अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केल्याने सुमारे ४० लाखांचा माल पडून राहिला.


भाजीपाल्याची नुकसानभरपाई
खरेदीदारांनी अचानक सौदे बंद पाडल्याने भाजीपाला पडून राहिला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई बाजार समितीने द्यावी, अशी मागणी जमीर बागवान व नंदकुमार वळंजू यांनी केली.
परवडत असेल तर घ्या...
ज्यांना अडत देणे परवडते त्यांनीच माल खरेदी करावा. तुमच्याशिवाय माल खपणार नाही, असे कोणी समजू नये, अशा शब्दांत नंदकुमार वळंजू यांनी खरेदीदारांना सुनावले.
जाधव-लायकर खडाजंगी
भाजी मंडई बंद ठेवण्यावर एकमत झाले; पण मंडईत शेतकरी विक्री करण्यास आले तर त्यांना परवानगी देण्यावरून संघटनेचे राजू जाधव व राजेंद्र लायकर यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तर मंडईत येणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणी गुरगुरले तर त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा भगवान काटे यांनी दिला.

Web Title: The vegetable market in the city is inaccessible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.