भाजी मार्केट कोलमडले
By admin | Published: June 5, 2017 12:31 AM2017-06-05T00:31:26+5:302017-06-05T00:31:26+5:30
भाजी मार्केट कोलमडले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेले चार दिवस सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाल्यासह सर्वच बाजारपेठेतील यंत्रणा अक्षरश: कोलमडून पडली आहे. भाज्यांची आवक निम्म्याहून घटल्याने त्याचा थेट परिणाम रविवारी आठवडी बाजारावर झाला. ग्रामीण भागातही शेतकरी संप व सरकारच्या भूमिकेबद्दल संताप वाढू लागला आहे.
शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करा, दुधाला ५० रुपये भाव द्या, या मागणीसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर गेले आहेत. शेतीमाल बाजारात न आणल्याने पेच निर्माण झाला आहे. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्याचा ताण विक्री व्यवस्थेवर जाणवत आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला केवळ १५२७ क्विंटल आवक झाली आहे. त्याचबरोबर फळांची आवक एकदम कमी झाली असून, ४८७ क्विंटल आवक झाली आहे. रविवारी बहुतांश गावांत आठवडी बाजार असतो. त्यात भाजीपाला न मिळाल्याने ग्राहकांची कुचंबणा झाली. गेल्या आठवड्यात २५ रुपये किलो असणारा वांग्यांचा दर ६० रुपयांपर्यंत गेला. ढबू ६०, कोबी ४०, दोडका ८०, गवार ६० रुपये; तर दोडक्यांचा उच्चांकी ८० रुपये किलोचा दर झाल्याने भाज्यांचे दर सामान्य ग्राहकांच्या हाताबाहेर गेले आहेत. येत्या दोन दिवसांत ही भाजीपाला टंचाई अधिक जाणवणार असल्याने दर गगनाला भिडणार आहेत.
ग्रामीण भागात संपाची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, गावोगावी बैठकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू असल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, संघटनांचे कार्यकर्ते संपात सहभागी होत असल्याने ग्रामीण भागातही सरकारच्या धोरणाविरोधात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. ज्या दुधावर रोजीरोटी अवलंबून आहे, ते दूध संघांना न पाठविण्याचा धाडसी निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्याचा परिणाम दूध संघाच्या संकलनावर झाला असून, जिल्ह्यातील प्रमुख दूध संघांचे रोज दीड लाख लिटरहून अधिक दूधसंकलन कमी झाले आहे. संकलन कमी झाल्याने विक्रीसाठी दूध कमी पडू लागले आहे.
दूध संकलन लवकर
कोल्हापूर बंद असल्याने प्राथमिक दूध संस्थांनी दूध संकलनाची वेळ लवकर घेतली आहे. पहाटे संकलन करून सातपर्यंत दूध संघापर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा रविवारी कार्यरत होती. अनेक गावांनी स्वत:हून संकलन बंद केले.
उद्या दूधटंचाई भासणार?
आजच्या ‘बंद’मुळे पुणे, मुंबईकडे जाणारी दूध वाहतूक विस्कळीत होणार आहे. त्याचा थेट परिणाम उद्या, मंगळवारी जाणवणार आहे. दुधाची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
असे घटले ‘गोकुळ’चे संकलन
१ जून- ५१ हजार लिटर
२ जून - १ लाख लिटर
३ जून- ८५ हजार लिटर
४ जून - ३५ हजार लिटर