‘भाजीपाला अडत’ आंदोलन चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2017 12:10 AM2017-03-05T00:10:29+5:302017-03-05T00:10:29+5:30

अडत धोरणाचा निषेध : खरेदीदार उद्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात

'Vegetable obstruction movement' got angry | ‘भाजीपाला अडत’ आंदोलन चिघळले

‘भाजीपाला अडत’ आंदोलन चिघळले

googlenewsNext

कोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांचे आंदोलन चांगलेच चिघळले असून, कोणत्याही परिस्थितीत अडत देणार नाही, यावर ते ठाम राहिले आहेत. सरकारच्या अडत धोरणाविरोधात उद्या, सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणाला बसण्याचा निर्णय खरेदीदार संघटनेने घेतला आहे.
गेले चार दिवस सहा टक्के अडतीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भाजीविक्रेत्यांची भूमिका ही शेतकरीविरोधी नसून दलालांच्या विरोधात आहे. आंदोलन शांततेत व कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था न बिघडविता सुरू आहे. उलट भाजी मंडईत शेतकऱ्यांना बसण्यास खरेदीदार सहकार्यच करीत आहेत; पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, बाजार समिती वारंवार काहीही कारण नसताना भाजी विक्रेत्यांच्या आंदोलनाला चिथावणी देऊन हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हीही विक्रेते या कोल्हापुरातीलच आहोत. आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवतो, असा इशारा संघटनेने पत्रकातून दिला आहे.
‘स्वाभिमानी’ला जशास तसे उत्तर देऊ
आमचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे हे व्यापाऱ्यांना दमदाटी करीत आहेत; पण त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राजू जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
वळंजूंना खरेदीदारांबद्दल पोटशूळ
नंदकुमार वळंजू यांना गोरगरीब खरेदीदारांबद्दल पोटशूळ असल्याने ते आमच्या विरोधात बोलत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला.
खरेदीदारांनी घेतली मुश्रीफ यांची भेट
खरेदीदारांनी शनिवारी दुपारी आमदार हसन मुश्रीफ यांची जिल्हा बॅँकेत भेट घेतली. मुश्रीफ यांनी सभापती पाटील यांना बोलावून घेऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी खरेदीदार अडत न देण्यावर ठाम राहिल्याने काहीच मार्ग निघाला नाही.

बाजार समितीला रोज ३० हजारांचा फटका
कोल्हापूर : भाजीपाला मार्केटमधील किरकोळ व्यापाऱ्यांच्या खरेदी बंदमुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला रोज ३० हजारांचा फटका बसत आहे. नियमित उलाढालीपेक्षा २५ ते ३० लाखांनी उलाढाल कमी झाल्याने त्याचा परिणाम समितीच्या उत्पन्नावर झाला आहे.
बाजार समितीत स्थानिक भाजीपाल्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. साधारणत: रोज दोन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक असते.
भाजी मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील भाजीपाला खरेदीदार माल उचलतात. एकूण माल आवकेच्या तुलनेत ३० ते ४० टक्के माल स्थानिक व्यापारी खरेदी करतात. उर्वरित माल कोकण, गोव्याला पाठविला जातो; पण अडतीवरून व्यापारी व अडते यांच्यात वाद सुरू झाला आहे. बुधवारपासून शहर व ग्रामीण भागातील किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे मार्केटमधील आवक कमी झाली आहेच; पण उठावही घटला आहे. नियमित आवकेपेक्षा किमान ४० टक्के मालाची आवक कमी झाली आहे.
भाजीपाला मार्केटमधील उलाढालीवर समितीला १ टक्का कर मिळतो. साधारणत: रोज २५ लाखांनी उलाढाल कमी झाल्याने त्यापोटी मिळणाऱ्या २५ हजार उत्पन्नात घट झाली आहे. त्याशिवाय समितीत येणाऱ्या चारचाकी वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारला जातो. त्याच्यापोटी किमान पाच हजार रुपये असे रोज ३० हजारांचे नुकसान सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे.


भाजीपाल्याचा टेम्पो फोडला
बाजार समितीतून भाजीपाला भरून तो कोकणात घेऊन जाणारा टेम्पो शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री सोन्यामारुती चौकात अज्ञात व्यक्तींनी फोडला. याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, आमचा या फोडाफोडीशी संबंध नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.


पोलिस बंदोबस्तात लक्ष्मीपुरी बाजार सुरू राहणार
भाजीपाला अडतीवरून गेले चार दिवस निर्माण झालेल्या पेचाबाबत बाजार समिती संचालकांनी शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन चर्चा केली. आज, रविवारी लक्ष्मीपुरी बाजार बंद पाडण्याची खरेदीदारांनी धमकी दिल्याचे सांगत पोलिस बंदोबस्तात बाजार सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी डॉ. सैनी यांच्याकडे केली.
शनिवारी दुपारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन अडतीबाबतची वस्तुस्थिती सांगितली. कोणत्याही परिस्थितीत लक्ष्मीपुरी बाजार बंद राहणार नाही, याची दक्षता पोलिस प्रशासन घेईल, असे डॉ. सैनी यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांची भेट घेतली. तांबडे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना रविवारी आठवडी बाजारात पोलिस बंदोबस्त लावण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: 'Vegetable obstruction movement' got angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.