भाजीपाल्यांचे दर स्थिर, अननस, तोतापुरी आंब्यांची आवक वाढली, दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:07 PM2019-07-01T12:07:16+5:302019-07-01T12:09:33+5:30
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे विक्रेते व शेतकरीही महापालिकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, पावसामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी फळ व पालेभाज्यांचे दर स्थिरच आहेत. कोंथिबीर, आले अजूनही वाढूनच आहेत. तोतापुरी व अननसांनी बाजार भरला असून, दरही १0 ते २0 रुपये प्रती नग झाले आहेत.
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे विक्रेते व शेतकरीही महापालिकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, पावसामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी फळ व पालेभाज्यांचे दर स्थिरच आहेत. कोंथिबीर, आले अजूनही वाढूनच आहेत. तोतापुरी व अननसांनी बाजार भरला असून, दरही १0 ते २0 रुपये प्रती नग झाले आहेत.
महापालिकेने स्वच्छता केल्याचे नाटक केले असले, तरी रविवारी बाजार भरल्यावर यातील फोलपणा दिसला आहे. गटारी तुंबून सर्व सांडपाणी संपूर्ण बाजारपेठेतील मुख्य मार्गावर पसरल्याने भाजी विकायची आणि खरेदी तरी कशी करायची, असा प्रश्न करत पाण्यातूनच वाट काढत खरेदी-विक्री सुरू होती. त्यातच पावसाच्या अधूनमधून सरी येत असल्याने या दलदलीत आणखीन भर पडत होती.
दोन दिवसांपासून संततधार बरसणाºया पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. मागणी नसल्याने दर मात्र गेल्या आठवड्याइतकेच स्थिर आहेत. वांगी, भेंडी, कारली, गवार, दोडका, ढबू ३0 ते ४0 रुपये किलो आहेत. दुधी भोपळा, पडवळचे बाजारात आगमन झाले आहे. कोबी, फ्लॉवर १0 ते २0 रुपये गड्डा आहे.
मेथी अजूनही दुर्मीळ असून, २0 ते २५ रुपये पेंढी असा दर कायम आहे. कोथिंबिरीचे दर्शन बाजारात दुर्मीळ झाले आहे. दरही मागील आठवड्याप्रमाणे ४0 ते ५0 रुपये पेंढी असेच चढे आहेत. पालक, पोकळा, लाल भाजी, तांदळी १0 ते १५ रुपये पेंढी आहे. लिंबूंचे दर उतरले असले, तरी आल्याचे दर वाढत चालले आहेत. ८0 रुपये किलो असणारे आले आता १५0 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
पावसाचा सर्वाधिक फटका फळ बाजाराला बसला आहे. हापूस आंब्याचा हंगाम संपला असून, त्याची जागा तोतापुरी आंब्यांनी घेतली आहे. २५ ते ३५ रुपये दराने विकला जाणारा तोतापुरी आंबा आता १0 रुपयांना तीनप्रमाणे विकला जात आहे. मोठ्या आकाराचा आंबा १५ ते २0, तर लहान आंबे १0 रुपयांना तीन आहेत. हीच परिस्थिती अननसाचीही झाली आहे. १0 ते ४0 रुपये असे दर आहेत. बाजारात सर्वत्र अननसच दिसत आहेत.
टोमॅटोचे ढीग
बाजारात टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. १0 ते २0 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. मागील आठवड्यात हेच दर ४0 रुपयांवर पोहोचले होते. टोमॅटो स्वस्त झाल्याने बाजारात लालभडक टोमॅटोचे ढीग वाढू लागले आहेत.
बाजारात व्यापाऱ्यांची गर्दी
पाऊस सुरू झाल्याने शेतकरी पेरणी व आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत; त्यामुळे बाजारात विक्रीसाठी बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमालीची रोडावली आहे. संपूर्ण बाजारपेठेत व्यापाऱ्यांची गर्दी दिसत आहे. बाजारपेठेत पाणी साचल्याने खाली बसण्याची सोय नसल्यानेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.