भाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली : कडधान्य, साखर तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:59 PM2019-08-26T13:59:29+5:302019-08-26T14:00:44+5:30
महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.
कोल्हापूर : महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.
महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा परिणाम कोल्हापुरातील आवकेवर झाल्याने दरात वाढ झाली; पण कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक झाल्याने दर थोडेफार आवाक्यात आले असताना या आठवड्यात भाजीपाल्याने आणखी उसळी घेतली आहे.
श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; त्यामुळे दरात वाढ झाली आहे. घेवड्याची आवक श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात होते. पावसामुळे ती कमी झाल्याने घेवड्याचे दर वाढले असून, किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे.
गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचेही दर ६० पासून १०० रुपयांपर्यंत आहेत. वांगी ७५ रुपये, तर ओला वाटाणा १२० रुपये किलो आहे. एरव्ही १0-१५ रुपये असणारा टोमॅटो रविवारी ३0 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. कोथिंबिरीची पेंढी २० रुपये, मेथी २५ रुपये, तर पालक २० रुपये पेंढी आहे.
महापुरानंतर कडधान्यांची आवक मंदावली असून, किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. ज्वारी ३५ ते ५० रुपये किलोपर्यंत आहे. तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात थोडी थोडी वाढ होत आहे. साखरेचे दरही वाढले असून, किरकोळ बाजारात ते ३६ रुपये किलो आहे. सरकी तेल, शाबूसह इतर किराणा वस्तूंचे दर स्थिर आहेत.
फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असली, तरी दर स्थिर राहिले आहेत. गणेशोत्सवासाठी फळमार्केट सज्ज झाले असून, सफरचंद, डाळिंब, मोसंबी, सीताफळाची आवक बऱ्यापैकी आहे. कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा २७ रुपये किलो आहे. बटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत.
गूळ ५० रुपये किलो!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात वाढ झाली आहे. गुळाचा हंगाम संपल्यापासून ४० रुपये किलो दर होता; मात्र किलोमागे १0 रुपयांची वाढ झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.
‘ड्रायगन’, ‘किव्ही’ची मागणी वाढली
जिल्ह्यात महापुरानंतर पावसाने एकदम उघडीप दिल्याने साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. रक्तातील प्लेटलेटची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, त्यासाठी ‘ड्रायगन’, ‘किव्ही’ फळांची मागणी वाढली आहे.