भाजी विक्रेते, दुकानदारांचे लसीकरण, कोविड चाचण्या करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:55+5:302021-04-12T04:20:55+5:30
कोल्हापूर : शहरातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, भाजी विक्रेते यांचे लसीकरण व कोरोना चाचणी तातडीने सुरू करण्यात ...
कोल्हापूर : शहरातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, भाजी विक्रेते यांचे लसीकरण व कोरोना चाचणी तातडीने सुरू करण्यात येणार असून तशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रविवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सर्व अधिकाऱ्यांची कोरोनापासून बचावाचे नियोजन करण्याबाबत आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी बलकवडे यांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्यापूर्वी त्याठिकाणचे इलेक्ट्रिक व फायर ऑडिट तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता व मुख्य अग्निशमन अधिकारी यांना दिल्या.
केएमटीकडील चालकांसह सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, विविध पथकात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही त्रास होत असल्यास तातडीने त्यांचे टेस्टिंग करून घ्यावे. कोविड केअर सेंटरसाठी जे काही साहित्य लागणार आहे. ते नियमाप्रमाणे तातडीने खरेदी करा, अशा सूचनाही बलकवडे यांनी दिल्या.
-नऊ भाजी मार्केटमध्ये चाचणीची व्यवस्था-
फेरीवाले, भाजी विक्रेते यांना आरटीपीसीआर चाचणी व लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या असून नऊ भाजी मार्केटमध्येच चाचणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील विक्रेत्यांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. होम डिलिव्हरी करणारे स्विगी व झोमॅटो या कंपन्यांच्या २०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेतली आहे.
पॉईंटर -
- शहरातील ५४ व्यापारी, विविध संघटनांना लसीकरण व चाचण्या करण्याच्या सूचना.
- शाळा व कॉलेज, खासगी क्लासेसमधील शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण झाले.
-कोविड मृतदेह दहनासाठी पंचगंगा स्मशानभूमीत १० जोत्यांसह गॅसदाहिनी राखीव.
- पंचगंगा स्मशानभूमीत १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती. बागल चौक दफन भूमीत दोन कर्मचारी नियुक्त.
-कोविडसाठी चार शववाहिका सज्ज, तर सर्व फायरमन, चालक यांचे लसीकरण पूर्ण.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले, परवाना अधीक्षक राम काटकर, प्रशासन अधिकारी शंकर यादव, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता नारायण भोसले, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, अतिक्रमण पथक प्रमुख पंडित पोवार, आरोग्य निरीक्षक गीता लखन यांची उपस्थिती होती.
(
फोटो देत आहे)