लालभडक टोमॅटो दोन रुपयांवर, ऐन श्रावणात भाजीपाला घसरला : मेथी दहा रुपयांना तीन पेंढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:42 AM2018-08-27T10:42:14+5:302018-08-27T10:48:05+5:30
ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. लालभडक टोमॅटोचा दर अक्षरश: मातीमोल झाला असून, घाऊक बाजारात दोन रुपये, तर किरकोळ बाजारात आठ रुपयांपर्यंत टोमॅटो घसरला आहे.
कोल्हापूर : ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. लालभडक टोमॅटोचा दर अक्षरश: मातीमोल झाला असून, घाऊक बाजारात दोन रुपये, तर किरकोळ बाजारात आठ रुपयांपर्यंत टोमॅटो घसरला आहे.
मेथीची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. किरकोळ बाजारात दहा रुपयांना मेथीच्या तीन पेंढ्यांची विक्री सुरू आहे. या तुलनेत फळबाजार स्थिर आहे. कडधान्य बाजारामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत फारशी चढउतार दिसत नाही.
श्रावण महिन्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढते आणि दर भडकतात. त्यात यंदा पाऊस जास्त असल्याने आवक कमी होऊन भाज्यांची चणचण भासेल, असा अंदाज होता; पण ऐन श्रावणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. घाऊक बाजारात कोबीचा दर सरासरी चार रुपये किलो राहिला आहे. वांगी, ढब्बू, घेवड्याचा दर २० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे.
गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी व वरणा ४० रुपये किलो आहे. टोमॅटोचा दर सगळ्यांत खाली आला आहे. घाऊक बाजारात दर सरासरी साडेसहा रुपये किलो असला तरी बहुतांश टोमॅटो दोन रुपये किलोनेच जातो. कोथिंबिरीची आवक स्थिर आहे. पाच ते सात रुपये पेंढी आहे.
मेथीची रोज २५ हजार पेंढीपेक्षा अधिक आवक सुरू असल्याने दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात दहा रुपयांना तीन पेंढ्या विक्री आहे. कांदापात, शेपू, पालक या पालेभाज्यांना मागणी चांगली असली तरी दरात चढउतार नाही.
फळमार्केटमध्ये डाळींब, सीताफळ, पेरू, पपईची रेलचेल सुरू आहे. सफरचंदची आवकही चांगली असून दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. डाळींब ३० रुपये किलो आहे. कडधान्य मार्केटमध्ये फारशी चढउतार दिसत नाही. तूरडाळ, हरभराडाळ, मटकी, मुगाचे दर स्थिर आहेत. साखरेचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. कांदा व बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारसा फरक पडलेला नाही.
मोरावळ्याची आवक वाढली
शहरातील मंडईत मोरावळ्याची आवक सुरू झाली आहे; पण त्याचा अपेक्षित उठाव दिसत नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
‘घटप्रभा’ची आवक जोरात
कोल्हापूर बाजार समितीत सांगली, कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होते; पण अलीकडे ‘घटप्रभा’ येथून भाजीपाला कोल्हापुरात येऊ लागला आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आवक वाढल्याने भाज्यांचे दर घसरल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.