वाहनधारकांचे ‘खड्डे भोजन’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:14 PM2020-01-01T20:14:59+5:302020-01-01T20:16:32+5:30
‘शिवाजी चौक ते गंगावेश’ हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच; परंतु चालणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे; त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन बुधवारी हे खड्डे भोजन आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर : मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंगावेश रस्त्याचे काम रखडल्याबद्दल येथील कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘खड्डे भोजन’ करून या रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
देशभरात नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना, कोल्हापुरात मात्र वाहनधारक महासंघाने रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी खड्ड्यात बसून खर्डा भाकरी खाऊन महापालिकेचा निषेध केला.
‘शिवाजी चौक ते गंगावेश’ हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच; परंतु चालणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे; त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन बुधवारी हे खड्डे भोजन आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांवर रांगोळीही रेखाटण्यात आली होती. जर या आंदोलनातून पालिका प्रशासनाला जाग आली नाही, तर अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यात बसविण्यात येईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व अभिषेक देवणे, चंद्रकांत भोसले, दिलीप सूर्यवंशी, विजय गायकवाड, राजेंद्र जाधव, राजू नागवेकर, भरत चव्हाण, पुष्पक पाटील, विनोद जाधव यांनी केले.
महापालिकेचा दावा -
* रस्त्याचे काम मंजूर असून, निधीसुद्धा उपलब्ध.
* जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने रस्त्याचे काम थांबविले.
* जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या ठेकेदारास सूचना.