वाहन तपासणी केंद्राची पालिकेस माहिती नाही
By admin | Published: October 5, 2015 11:51 PM2015-10-05T23:51:28+5:302015-10-06T00:24:10+5:30
कागल नगरपालिका सभा : पत्रव्यवहार करूनही दखल नाही; चौकशी करण्याचा ठराव
कागल : कागल नगरपालिका हद्दीत असतानाही प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तब्बल ४२ एकर क्षेत्रात गेली वर्षभर नवीन वाहन तपासणी केंद्र उभारण्यासाठी बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, यासाठी कागल नगरपरिषदेला त्यांनी कोणतीच माहिती सादर केलेली नाही. पत्रव्यवहार केला असता त्यांची दखलही घेतली नाही म्हणून या प्रकाराची कायदेशीर चौकशीचा ठराव सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या. मुख्याधिकारी प्रभाकर पत्की प्रमुख उपस्थित होते. या सभेला १७ पैकी केवळ सात नगरसेवक उपस्थित होते. तपासणी केंद्र उभारताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नगपालिका हद्दीत असतानाही पालिकेची दखल घेतलेली नाही. या बांधकाम नियमावलीनुसार शासनाचे काम असल्याने प्रस्तावीत कामाचे नकाशे माहितीसाठी पालिकेकडे सादर करणे बंधनकारक आहे. नगरपरिषदेच्या वतीने शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये हा प्रकल्प दाखविणे कायदेशीर असताना पत्रव्यवहार करूनही या कार्यालयाने दखल घेतली नसल्याने कायदेशीर कारवाईसाठी चौकशीचा निर्णय घेतला. विषय पत्रिकेवर ३६ विषय होते. त्यामध्ये जयसिंगराव तलावात विहिरीतून पाणी सोडणे, घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती, प्रकल्पासाठी १ कोटी ४६ लाख रुपयांचे मशीन खरेदीचे पैसे देणे, कोरवी समाज मंदिर जागेत सांस्कृतिक हॉल बांधणे, नवीन पदभरती करणे, जलतरण तलाव, शाहू क्रीडांगण, बोटिंग क्लब चालविण्यास देण्यासाठी नवीन ठेका काढणे, विविध विकासकामे यांना मंजुरी दिली. शिक्षक मारुती व्हरकट यांच्याबद्दल आलेल्या तक्रारीबाबत चौकशी समिती नेमण्याचा निर्णयही झाला. चर्चेत पक्षप्रतोद रमेश माळी, विरोधी नगरसेवक भैया इंगळे, संजय कदम, आशाकाकी माने, रंजना सणगर, अंजुम मुजावर यांनी सहभाग घेतला.
स्मारकास जागा
या सभेत ज्युदो खेळाडू उदय नागराळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर भैया इंगळे यांनी कै. विक्रमसिंहराजे घाटगे आणि कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मारकांसाठी नगरपालिकेने जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणी केली. त्यास सर्वांनी सहमती दिली. ३६ विषय असूनही अवघ्या तासाभरात सभा झाली.
सत्ताधारी गटातील धुसफूस चव्हाट्यावर...
जहाँगीर शेख ल्ल कागल
कागल पालिकेच्या निवडणुकीसाठी आता फक्त एक वर्षाचा कालावधी बाकी असताना सत्ताधारी गटात सुरू असलेली अंतर्गत धुसफूस सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली. सभेस सत्ताधारी आघाडीतील शाहू आघाडीचे सर्व नगरसेवक गैरहजर राहत, तर राष्ट्रवादी काँगेसच्याही चार नगरसेवकांनी दांडी मारल्याने ‘कोरम’ पूर्ण होण्याचा प्रश्न निर्माण झाला. या प्रकाराची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती; मात्र अनुपस्थितीत नगरसेवकांनी याविषयी वैयक्तिक कारणे सांगत दांडी मारण्याच्या प्रकारावर उघड भाष्य करणे टाळले आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता ही सभा बोलविण्यात आली होती. काही नगरसेवक गैरहजर राहणार आहेत ही चर्चा सकाळी नऊ वाजल्यापासून पालिक वर्तुळात सुरू होती. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सभागृहात १७ पैकी सात नगरसेवक जमले. त्यामध्ये विरोधी गटाचे संजय कदम, भैया इंगळे, तर सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षा संगीता गाडेकर, पक्षप्रतोद रमेश माळी, आशाकाकी माने, अंजूम मुजावर, रंजना सणगर यांचा समावेश होता. संजय कदम, भैया इंगळे यांनी कोरमअभावी सभा ‘रद्द’ करावी, सभेला दांडी मारण्यामागची कारणे काय? नगरसेवकांची अनुपस्थिती अयोग्य आहे, अशी टीका केली. पक्षप्रतोद रमेश माळी यांनी १७ पैकी सात सदस्य सभागृहात असल्याने कायद्याने एकतृतीयांश सदस्य व कोरम पूर्ण होतो असा नियम सभागृहात सादर केल्याने सभेला रीतसर सुरुवात झाली. कागल पालिकेसाठी ‘कोरम’चा प्रश्न निर्माण व्हावा ही खेदजनक बाब असल्याची टीका विरोधी नगरसेवकांनी केली, तर नगराध्यक्षा आणि पक्षप्रतोद यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले. पण, आजच्या सभेस ‘दांडी प्रकरणा’वर शहरभर चर्चा सुरू होती.
१७ पैकी १० नगरसेवक गैरहजर
सभेस दांडी मारलेले नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चित्रारी, प्रवीण गुरव, रणजित बन्ने, बेबीताई घाटगे, अजित कांबळे, राजू डावरे (स्वीकृत) शाहू आघाडीच्या उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, मारुती मदारे, सन्मती चौगुले, मनोहर पाटील (स्वीकृत), नम्रता कुलकर्णी, सुमन कुऱ्हाडे यांनी सभेस दांडी मारली; मात्र या मागे ठरवून काही नव्हते. वैयक्तिक कामामुळे येता आले नाही, अशी कारणे काहींनी सांगितली.
दांडी प्रकरण नेतेमंडळींपर्यंत
पालिकेत राजे-मुश्रीफ गटाची संयुक्त सत्ता आहे. प्रामुख्याने विकासकामांचा निधी वाटप या विषयावर नगरसेवकांच्या मागे सुरुवातीपासूनच नाराजी आहे. पार्टी मिटिंगमध्ये यावर जोरदार चर्चा झाल्या आहेत. मात्र, चार वर्षांत पहिल्यांदाच असे ‘दांडी’ प्रकरण घडल्याने हे प्रकरण आता आ. हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यापर्यंत पोहोचले आहे.