हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी वाहनधारकांचे हेलपाटे, ३० एप्रिलपर्यंत मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:23 IST2025-03-08T12:22:45+5:302025-03-08T12:23:13+5:30
वाहनधारकांना नंबरप्लेट आल्याचे ‘एसएमएस’ येतात. मात्र, नंबरप्लेट उपलब्ध नसल्याचा अनुभव

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी वाहनधारकांचे हेलपाटे, ३० एप्रिलपर्यंत मुदत
कोल्हापूर : राज्य सरकारने १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बंधनकारक केली. मात्र, जिल्ह्यात ही नंबरप्लेट बसविण्यासाठी सुरू असलेल्या अंमलबजावणीचे तीन-तेरा वाजले आहेत. वाहनधारकांना नंबरप्लेट आल्याचे ‘एसएमएस’ येतात. मात्र, नंबरप्लेट उपलब्ध नसल्याचा अनुभव येत असल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविण्यासाठी मुदत दिली आहे.
ही नंबरप्लेट वाहनधारकांनी बसविली नसल्यास पाच हजारांचा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालय करणार आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून वेळ आणि तारीख निवडत आहेत. त्यासाठी दुचाकीसाठी ४५०, तीनचाकीसाठी ५०० आणि इतर सर्व वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारणी केली जात आहे.
जिल्ह्यातील २९ डिलर्सना अधिकृत फिटनेस सेंटर म्हणून मान्यता दिली असून येथे नंबरप्लेट बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक वाहनधारकांना तुमची नंबरप्लेट आल्याचा ‘एसएमएस’ मोबाइलवर येत आहे. त्यानुसार फिटनेस सेंटरमध्ये गेल्यानंतर अद्याप तुमची नंबरप्लेट आली नसल्याचे वाहनधारकांना सांगितले जात आहे.
नंबरप्लेट उपलब्ध नाही
वाहन चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि बनावट नंबरप्लेट्सचा वापर रोखण्यासाठी ही प्रणाली लागू केली जात आहे. अद्याप जिल्ह्यात ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटच्या प्रतीक्षेत सुमारे ७ लाखांहून अधिक वाहने आहेत. मात्र, त्या तुलनेत फिटनेस सेंटरकडे पुरेसा कर्मचारीवर्ग आणि नंबरप्लेटची उपलब्धता नाही. त्यामुळे अंमलबजावणीचे तीन-तेरा वाजले आहेत.
नंबरप्लेटचे उत्पादन
निगडेवाडी (ता. करवीर) परिसरातील एका कारखान्यात हाय सिक्युरिटी नंबरप्लेट तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, जितकी वाहनधारकांची मागणी आहे, तितक्या प्रमाणात या नंबरप्लेट उपलब्ध होत नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
नंबरप्लेट आल्याचा ‘एसएमएस’ आला. त्यानुसार उद्यमनगरातील एका फिटनेस सेंटरवर गेलो असता तुमच्या वाहनाची नंबरप्लेट आली नसल्याचे सांगितले. असा दोनवेळा प्रकार अनुभवला. त्यामुळे नंबरप्लेट उत्पादित करणारी कंपनी आणि फिटनेस सेंटरमध्ये सावळा गोंधळ असून, वाहनधारकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. - अतुल देसाई, वाहनधारक